Bollywood News : मनोरंजन विश्वात छोटा पडदा असो किंवा मोठा काही असे कलाकार असतात जे त्यांच्या कलेच्या बळावरच मोठे होत असतात. भूमिका लहान किंवा मोठी याच्याशी त्यांना देणंघेणं नसतं. अशाच एका कलाकारानं विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. कधी तो पोलिसांच्या रुपात दिसला, तर कधी खलनायकाच्या, कधी तो इतक्या नकारात्मक भूमिकेत दिसला की प्रेक्षकांनाही त्याच्या वृत्तीची चीड आली. असा प्रभावी अभिनय सादर करणारा हा अभिनेता म्हणजे विश्वजीत प्रधान (Vishwajeet Pradhan). (Vishwajeet Pradhan to maeke come back in Advertiusment world read details)
जवळपास 30 वर्षांपूर्वी जिथून विश्वजीतनं त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती त्याच टप्प्यावर तो आज पोहोचला आहे. हा टप्पा आहे जाहिरात विश्वाचा. विश्वजीतनं पुन्हा एकदा एका जाहिरातीमध्ये काम केलं असून, तब्बल 30 वर्षांनंतर हे विश्व पाहिलं आहे.
फ़िरोज़ खान (Feroze Khan) यांनी विश्वजीतला 'यलगार' (Yalgar) चित्रपटातून पहिली संधी दिली होती. त्या क्षणापासून त्यानं कधीच मागे वळून पाहिलं नाही. याआधी त्यानं कोलगेचच्या जाहिरातीत काम केलं होतं. आपल्या या प्रवासाविषयी सांगताना तो म्हणाला, '1989 मध्ये जाहिरातींपासून काम सुरु करण्याची संधी मिळण्याबाबत मी स्वत:ला नशीबवान समजतो. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी मी बऱ्याच जाहिराती केल्या'.
पहिल्या चित्रपटानंतर तो कारकिर्दीत पुढे जात राहिला, सोबत मालिकांमध्येही नशीब आजमावू लागला. आता नशीबानं त्याला पुन्हा तिथेच आणून ठेवलं आहे जिथून त्याची सुरुवात झाली होती.
'मोहरा' (Mohara), 'डुप्लिकेट' (Duplicate), 'गदर: एक प्रेम कथा' (Gadar Ek prem katha) यांसारख्या चित्रपटांसह त्यानं आतापर्यंत तब्बल 225 चित्रपटांत भूमिका निभावल्या. 'आर्या' (Arya) या थ्रिलर वेब सीरिजमधूनही तो झळकला होता. लवकरच सुष्मिता सेनची (Sushmita sen) मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'आर्या 3' च्या चित्रीकरणाची तो सुरुवात करणार आहे.