Maharashtra Casteism Issue: विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है च्या घोषणा दिल्यात. भाजपनं हिंदू मतांच्या एकीसाठी ही घोषणा दिलीये हे लपून राहिलेलं नाही. शरद पवारांनी भाजपच्या या रणनितीवर टीका केलीय. भाजप निवडणुकीत जातीयवाद करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. भाजप जातीजातीत भांडणं लावत असल्याचा आरोप केलाय. तर भाजपनंही शरद पवारांवर पलटवार केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या पहिल्या प्रचारसभेपासून एक है तो सेफ है चा नारा दिलाय. तर योगी बटेंगे तो कटेंगे अशी भीती हिंदू मतदारांना दाखवू लागलेत. भाजपच्या या निवडणूक रणनितीवर शरद पवारांनी निशाणा साधलाय. भाजप महाराष्ट्रातली निवडणूक जातीयवादाकडं नेत असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. जाती-जातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय.
एक है तो सेफ है या भाजपच्या घोषणेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही निशाणा साधलाय. मोदी आणि शहांच्या महाराष्ट्रातील प्रचारामुळं सामान्यांना असुरक्षित वाटू लागल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय.
महाराष्ट्रातल्या मतदार उत्तरेतील राज्यांतील मतदारांसारखा नाही त्यामुळं बटेंगे तो कटेंगे ची घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही असं अजित पवारांना वाटतंय.
शरद पवारांनी केलेला आरोप भाजपनं फेटाळलाय. जातीयवादावर निवडणुका कोण लढवत होतं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असा टोला दरेकरांनी लगावलाय.
लोकसभा निवडणुकीत राम मंदिरसारखा मुद्दा महाराष्ट्रातल्या मतदारांना भुरळ पाडू शकला नाही. त्यामुळं एक है तो सेफ है हा मुद्दाही महाराष्ट्रातल्या मतदारांना कितपत भावेल याबाबत शंका व्यक्त केली जातेय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीत (Worli) प्रचारसभा घेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढील हिंदूह्रदयसम्राट उपाधी काढण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटेल म्हणून त्यांनी ते काढून टाकलं अशी टीका राज ठाकरेंनी केलं. तसंच आज त्याच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मौलवी फतवा काढतात असा संतापही त्यांनी व्यक्त केला. मनसेने वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात (Aditya Thackeray) संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. "मुस्लिम मौलवी आज फतवे काढत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले हे तुम्हाला माहित आहे. विचारधारा नावाची काही गोष्टत नाही. 2019 मध्ये निवडणुका झाल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या अब्रू बाजूला ठेवल्या. एके दिवशी सकाळी सहा वाजता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत. अर्धा तास लग्न टिकलं आणि घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्या झाल्या उद्धव ठाकरे यांनी बघितलं आपल्याला कोण कोण डोळा मारत आहे.. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष नको म्हणून लोकांनी शिवसेना आणि भाजपला मतदान केलं. किंवा शिवसेना भाजप नको म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला काही लोकांनी मतदान केलं. पण भाजप आणि राष्ट्रवादी यांचा शपथविधी आधी होतो. मग त्यातली एक उठते आणि उरलेल्या दोघांबरोबर संसार करायला लागते. जनाची नाही कशाशी लाज नाही," अशी टीका राज ठाकरेंनी केली.