Panchayat Web Series: पंचायत वेब सीरिज प्रचंड लोकप्रिय झाली आहे. पहिल्या भागानंतर दुसऱ्या भागातही प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात ही वेब सीरिज यशस्वी ठरली. त्यामुळे तिसऱ्या भागाबाबत पंचायत वेब सीरिज चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 'गाव फुलेरा'च्या या कथेची लोकप्रियता पाहून अॅमेझॉन प्राइमने त्याचा पुढचा सीझन आणण्याचा प्लान आखला आहे. मात्र, दुसऱ्या हंगामाच्या अखेरीस ग्रामपंचायतीचे सचिव अभिषेक त्रिपाठी यांची दुसऱ्या ठिकाणी बदली झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता सचिवजी आणि रिंकीचं काय होणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
'पंचायत' वेब सीरिजचा तिसरा भाग लवकरच
मीडिया रिपोर्ट्सनुसार अॅमेझॉन प्राइमने 'पंचायत' वेब सीरिजचे यश पाहता लवकरच पुढील सीझन आणण्यासाठी कंबर कसली आहे. यासंदर्भात त्यांनी निर्मात्यांशी संपर्क साधला आहे. यापूर्वी 2024 पर्यंत तिसरा सीझन आणण्याची योजना होती, परंतु आता निर्मात्यांना 2023 पर्यंत वेब सीरिज आणण्याची विनंती केल्याचं बोललं जात आहे. इतकंच नाही तर अॅमेझॉन प्राइमने या 'पंचायत'ची पंचवार्षिक योजना तयार आहे. म्हणजेच येत्या काही वर्षांत आणखी तीन भाग येणार आहेत. अशाप्रकारे येत्या काळात या वेब सीरिजचे एकूण पाच भाग असतील. अॅमेझॉन प्राइमने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
आयएमडीबी रेटिंग
येत्या सीझनमध्ये प्रेक्षकांना सचिवजी आणि रिंकी यांच्यातील रोमान्सच्या नव्या छटा पाहायला मिळतील. उल्लेखनीय आहे की या मालिकेत जितेंद्र कुमार पंचायत सचिव आहेत तर नीना गुप्ता, रघुबीर यादव आणि सानविका हे फुलेरा गावातील कुटुंब प्रमुख म्हणून दिसत आहेत. येत्या काळात या मालिकेतील काही पात्रे बदलतील असे सांगितले जात आहे. पण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे पंचायत सचिव अभिषेक त्रिपाठी आणि फुलेरा गावची प्रमुख मंजू देवी, तिचे पती ब्रिजभूषण दुबे आणि तिची तरुण मुलगी रिंकी या मालिकेत असतील. आयएमडीबी रेटिंग 8.9 आहे आणि सर्वोच्च आंतरराष्ट्रीय रेट केलेल्या शोमध्ये त्याचा समावेश आहे.