जेव्हा निर्मात्यांना होती अक्षयच्या अभिनयावर शंका

अॅक्शन पटांमध्ये झळकल्यानंतर अखेर.....

Updated: Nov 22, 2018, 09:19 AM IST
जेव्हा निर्मात्यांना होती अक्षयच्या अभिनयावर शंका title=

मुंबई : कलाविश्वात पदार्पण केल्यानंतर अनेक मंडळी आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित करतात. अभिनय शैलीच्या बळावर ही मंडळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता अक्षय कुमार. 

अॅक्शनपटांमध्ये अभिनय करत खिलाडी कुमार ही ओळख मिळवणारा अक्षय कुमार हा आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. पण, त्याच्या कारकिर्दीत एक असं वळण आलं होतं, जेव्हा त्याच्या अभिनय कौशल्यावरच प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं होतं. 

खुद्द अक्षयनेच याविषयीचा खुलासा केला. 'आजच्या घडीला मी जवळपास १३५-१४० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सुरुवातीच्या काळात म्हणाल तर तेव्हा मी फक्त आणि फक्त अॅक्शन पटांमध्ये काम केलं. त्यामागचं कारण असं होतं की निर्माते- दिग्दर्शकांना मला अभिनयच येत नाही असं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी फक्त असेच चित्रपट साकारले ज्यामध्ये साहसी दृश्य तुलनेने जास्त असतील', असं तो म्हणाला. 

अॅक्शन पटांमध्ये झळकल्यानंतर अखेर खिलाडी कुमारने त्याचा मोर्चा विविध धाटणीच्या चित्रपटांकडे वळवला. ज्यामध्ये त्याने विनोदी आणि सामाजिक संदेश देणारे चित्रपट साकारले. एका कार्यक्रमागरम्यान त्याने हे वक्तव्य केलं. 

अक्षयच्या कारकिर्दीचा आलेख पाहिला तर लगेचच ही बाब लक्षात येत आहे की सध्याच्या घडीला तो सर्व धाटणीच्या चित्रपटांमध्ये काम करण्यास प्राधान्य देत आहे. 

येत्या काळात अक्षय एस.शंकर यांच्या '२.०' या बिग बजेट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याशिवाय तो 'केसरी', 'हाऊसफुल्ल ४' अशा चित्रपटांमधून झळकणार आहे. त्यामुळे येत्या काळात अक्षयची ही विविध रुपं प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळणार आहे हे खरं.