मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहत आहेत. काही दिवसांपूर्वी वरूण धवन त्याच्या गर्लफ्रेंड नताशा दलाल सोबत विवाह बंधनात अडकला. वरूणनंतर आता अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील विवाह बंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहे. श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठा (Rohan Shrestha) अनेक दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. अनेकदा दोघांना कार्यक्रमांमध्ये आणि इतर ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आले आहे.
दरम्यान श्रद्धा आणि रोहनच्या लग्नाच्या चर्चा जोर धरत असताना शक्ती कपूर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'श्रद्धा लग्न करत असेल तर माझी काही हरकत नाही. ती तिच्या आवडीनुसार स्वतःचा जीवनसाथी निवडू शकते. मला तिच्या नात्याबद्दल काही कल्पना नाही.' असं शक्ती कपूर म्हणाले.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, मी श्रद्धासोबत नेहमी आहे. रोहन श्रेष्ठाचं नाही, इतर कोणत्या मुलाला तिने जीवनसाथी म्हणून निवडलं तरी मला काही हरकत नाही. ते पुढे म्हणाले रोहन एक चांगला मुलगा आहे. श्रद्धा आणि रोहन लहानपणापासून चांगले मित्र असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे श्रद्धा आता कधी नवरी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.