जागतिक संगीत दिन विशेष : संगीत एक प्राचीन कला...

संगीत निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत आहे.

Updated: Jun 21, 2019, 05:28 PM IST
जागतिक संगीत दिन विशेष : संगीत एक प्राचीन कला...  title=

कोमल वावरकर , झी मीडिया, मुंबई : २१ जून, आज जागतिक संगीत दिन. जगात शांती प्रस्थापित करण्याच्या हेतूने हा दिवस जागतिक पातळीवर संगीत दिन म्हणून साजरा केला जातो. ही पद्धत संगीत विशारद ‘लॉर्ड मेहुदी मेनुहीन’यांनी १९८१ साली सुरु केली होती. भारतीयमध्ये  वैदिक काळापासूनच संगीत कलेला जास्त महत्व आहे. वैदिक काळापासून पंडित देखील चाल लावून ऋचा म्हणत असतं. ऋग्वेदातील कडव्याला 'ऋचा' असे म्हणतात. हिंदू देवांच्या मूर्ती पाहिल्या तर आपल्याला दिसते की, देवांची मूर्ती वाद्य धारण करून असते. संगीताची देवता म्हणून सरस्वतीचे पूजन केले जातं. सामवेदामध्ये  संपूर्ण संगीत कलेबद्दल माहिती दिली आहे. सामवेदात अनेक वाद्यांचा उल्लेख आहे. अश्मयुगीन काळात आदिमानव स्वत:च्या मनोरंजनासाठी संगीत कलेचा वापर करत असे. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात देखील  संगीताचा उल्लेख केला आहे. अनेक प्राचीन ग्रंथात संगीत साहित्याचा उल्लेख पाहायला मिळतो.

संगीतशास्त्र  प्राचीन असल्याने त्याला आधुनिक काळात देखील फार महत्व आहे. संगीत निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीत आहे. मग पाऊस पडताना आलेला आवाज असो वा पक्ष्यांचा किलबिलाट असो. संपूर्ण निसर्ग हा संगीतमय आहे. प्राचीन काळात अनेक बंदिशी रचल्या गेल्या होत्या. या बंदिशी ऐकायला फार मधुर वाटतं. संगीतात काही घराणी आहेत. यामध्ये ग्वाल्हेर घराणे मुख्य मानले जातात. हस्सू, हद्दू खाँ आणि दादा नत्थन पीरबख्शराजा यांना ग्वाल्हेर घराण्याचे जन्मदाता मानले जातात. मानसिंह तोमर धृपद गायनाचे पितामह म्हणून ओळखले जातात. मानसिंह तोमर  यांनी १४८६ - १५१६ मध्ये 'ग्वालियर स्कूल ऑफ म्युझिक'ची स्थापना केली. 

उस्ताद हसू-हद्दू-नाथू खान यांचे ग्वाल्हेर घराण्याच्या वाटचालीत मोठे योगदान आहे. याच परंपरेचे शिष्य म्हणजे बालकृष्ण बुआ इचलकरंजीकर होते. त्यांचे शिष्य पं॰ विष्णू दिगंबर पलुस्कर हे होते. त्यांनी १९०१ मध्ये गांधर्व महाविद्यालची स्थापना करत संगीत क्षेत्रात एक प्रकारची क्रांती घडवून आणली. या व्यतिरिक्त आणखी एक नाव संगीत साहित्य क्षेत्रात मोठे आहे. हे नाव म्हणजे विष्णु नारायण भातखंडे.  भातखंडे यांना संगीताचे व्याकरणकार म्हणून ओळखले जाते. यांचे हिंदुस्तानी संगीतसाठी  फार मोठे योगदान राहिले आहे.