air pollution affects our health : सध्या शहरीकरणाचा वेगामुळे प्रदूषणाचा धोकाही तितकाच वाढला आहे. प्रदूषण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही तुम्ही अडचणीत येऊच शकतात. प्रदूषणामुळे श्वसनाचे अनेक विकार होतात आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी परिणाम देखील होतात. वायू प्रदूषणामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्याला मोठा धोका निर्माण होत आहे. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढले आहेत. वायू प्रदूषण हे फुफ्फुसांच्या आजारांचे प्रमुख कारण आहे. एवढेच नव्हे तर वायू प्रदूषणामुळे मधुमेह आणि स्लीप एपनिया यांसारखे इतर आजारही बळावतात असे आरोग्य तज्ञांनी सांगितले.
अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, वायू प्रदूषणाच्या थेट संपर्कात आल्याने हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. पार्टिक्युलेट मॅटर (PM2.4 आणि PM10), नायट्रोजन डायऑक्साइड (NO2) आणि कार्बन मोनोऑक्साइड (CO) यांसारखे वायु प्रदूषक रक्तप्रवाहात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव निर्माण होतो. यामुळे, एथेरोस्क्लेरोसिस होतो, ज्यामध्ये रक्तवाहिन्या जाड किंवा कडक होतात. एथेरोस्क्लेरोसिस हे हृदयविकार, पक्षाघात आणि पक्षाघाताचे प्रमुख कारण आहे. फुफ्फुसांवर वायू प्रदूषणाचे होणारे दीर्घकालीन परिणाम अतिशय चिंताजनक आहेत. सुमारे 30 वर्षांपूर्वी, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसिज (सीओपीडी) याचे प्रमाण नगण्य होते. आज, सीओपीडीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढली आहे. सीओपीडीचे एक प्रमुख कारण म्हणजे वायू प्रदूषण. सीओपीडी आजारांमुळे आपत्कालीन स्थितीत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वायू प्रदूषणामुळे 20 टक्क्यांनी वाढली आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अहवालानुसार 2019 मध्ये भारतात वायू प्रदूषणामुळे 16.7 लाख लोकांचा मृत्यू झाला. 2020 मध्ये देशातील कोरोना महामारीमुळे झालेल्या एकूण मृत्यूंच्या तुलनेत हा आकडा सुमारे 12 पट जास्त आहे. फुफ्फुसाच्या 40 टक्के आजारांना वायू प्रदूषण कारणीभूत असल्याचे नोंदवले गेले आहे. नेचर जेनेटिक्समध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, वायू प्रदूषणामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित सर्व प्रकारच्या असंसर्गजन्य रोग, स्वयंप्रतिकार रोग, मधुमेह, संधिवात इत्यादींचा धोका वाढतो. तसेच तुम्ही दिवसातून 25,000 वेळा श्वास घेता आणि बाहेर सोडता. प्रदूषित हवेच्या सतत संपर्कामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. विशेषत: हिवाळ्यात वायू प्रदूषण वाढल्यामुळे फुफ्फुसाच्या समस्यांनी त्रस्त लोकांची समस्या वाढते.