मुंबई : सध्याच्या अनियमित जीवनशैलीमुळे अनेकजण वेळेवर जेवण करत नाहीत. अशामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. बहुतांश लोकांमध्ये ही समस्या दिसून येते. शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल हार्टअटॅकचं मुख्य कारण ठरू शकतं. कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळं हृदयासंबधीचे आजार वाढू शकतात.
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश कार ज्यामुळं कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल. जाणून घेऊया अशा काही पदार्थांबाबत जे कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतात.
ज्यांची कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त वाढली आहे अशांनी आपल्या आहारात लिंबाचा समावेश करावा. लिंबूत फायबरची मात्रा आढळून येते. यामुळं कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर आहारात लसणाचा समावेश जरूर करावा. लसूण हे कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर ठरतं. दररोज सकाळी आणि सायंकाळी लसूण खाल्ल्यानं वाईट कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढतं.
आवळा आणि कोरफडीच्या ज्यूस प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. दररोज सकाळी उपाशीपोटी आवळा आणि कोरफडाच्या ज्यूसचं सेवन करा. यामुळं शरीरातील चांगलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढण्यास मदत होते.
कोलेस्ट्रॉल पातळी कमी करण्यासाठी पायी चालणं हा उत्तम पर्याय आहे. दररोज 30 मिनिटं पायी चालल्यास अनेक फायदे होऊ शकतात. कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी पायी चालणं हा रामबाण उपाय आहे.
मेथीचं पाणी देखील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर ठरतं. मेथीमध्ये असे काही गुणधर्म आढळतात ज्यामुळं वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत होते. त्यामुळं रोज एक कप मेथीच्या पाण्याचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं.