बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे आतड्यांवर होतोय दुष्परिणाम

 वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण पटकन बरा होऊ शकतो

Updated: Sep 27, 2020, 10:12 AM IST
बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे आतड्यांवर होतोय दुष्परिणाम

मुंबई : कॅन्सर या आजाराचं नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या पायाखालची जमिन सरकते. त्यातच कॅन्सर असल्याचं निदान झाल्यास आता मृत्यू अटळ असं मानून अनेक जण जगण्याची आशा सोडून देतात. कॅन्सरचे विविध प्रकार आहेत. त्यातील एक म्हणजे आतड्यांचा कॅन्सर. वैद्यकीय भाषेत याला कोलोरेक्टल कॅन्सर असं म्हणतात. यात आतड्यांमध्ये गाठी तयार होतात. पण या आजाराचं वेळीच निदान आणि उपचार झाल्यास रूग्ण पटकन बरा होऊ शकतो, असे कर्करोगतज्ज्ञ सांगत आहेत. 

आतडे ही पाचन व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे आणि म्हणूनच, शरीरातील पोषक घटक, खनिजे आणि पाणी शोषण्यास मदत करणारी ही प्रमुख भूमिका आहे. कोलन स्टूलच्या स्वरुपात कचरा काढून टाकण्यास मदत करतो. मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा आतड्याच्या आतील आवरणापासून सुरू होऊन पुढे पसरतो. काही वेळेला मोठ्या आतड्यामध्ये लहान गाठी दिसून येतात. त्या सुरुवातीला कॅन्सरच्या नसतात, मात्र अनेक वर्षे त्या आतड्यामध्ये राहिल्यास त्याचे रूपांतर कॅन्सरच्या गाठींमध्ये होऊ शकते. कोनोस्कोपीसारख्या वैद्यकीय चाचणीद्वारे याचे निदान होते. वेळीच निदान झाले, तर वैद्यकीय उपचारांनंतर आतड्यांचा कॅन्सर बरा होऊ शकतो.

कोलोरेक्टल (मोठ्या आतड्याचा)कॅन्सर आणि मूळव्याधाची लक्षणे जवळपास सारखी आहेत. बद्धकोष्ठता, आतड्यांमधील रक्त, गुदाशयातील रक्तस्त्राव, पोटदुखी, वारंवार गॅस होणे, काळा किंवा गडद रंगाचा मल तसेच अशक्तपणा यासारखी लक्षणे दिसल्यास मुळव्याधाचा त्रास आहे, असे म्हणून दुर्लक्ष न करता मोठ्या आतड्याचा कर्करोग तर नाही ना याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्याकरिता तज्ञ डॉक्टरांची भेट घेऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे. रुग्णांचे हे लक्षात ठेवावे की वेळीच निदान झाल्यास या आजारातून मुक्त होता येते आणि त्याकरिता त्वरीत उपचार करणे आवश्यक असल्याचे मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटलचे कोलोरेक्टल सर्जन,  डॉ. प्रवीण गोरे यांनी सांगितले.

केवळ प्रौढच नव्हे तर तरुणांनाही कोलोरेक्टल कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. याला कारणीभूत गोष्टी म्हणजे अनियमित वेळापत्रक, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यस्त जीवनशैली. योग्य निदानासाठी आणि उपचारांच्या या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांची मदत घेणे फायदेशीर ठरेल असेही डॉ. गोरे म्हणाले. 

कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडेंट्सयुक्त आहार घ्यावा. आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा. मद्यपान आणि धूम्रपान टाळा. दैनंदिन व्यायामाला महत्त्व द्या. कोणतीही व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. वजन नियंत्रणात ठेवा. जंक फुड, खारट, मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन टाळा, विशेषत: ज्यात प्रीझर्व्हेटिव्ह्ज आहेत अशा पदार्थांपासून लांबच रहा. कौटुंबिक इतिहासात जर कोलोरेक्टर कॅन्सर असल्यास नक्कीच स्वतःची तपासणी करायला हवी असे डॉ. गोरे सांगतात.