'माझ्या अंत्यसंस्कारासाठी पत्नीकडे पैसे नसल्याने मला...'; स्वत:ला संपवण्यापूर्वी 'त्या' पुणेकराचे शेवटचे शब्द

Pune Crime News: पुण्यामधील पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी हा प्रकार घडला असून राहत्या घरामध्ये या रिक्षाचालकाने स्वत:ला संपवलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 5, 2025, 07:11 AM IST
'माझ्या अंत्यसंस्कारासाठी पत्नीकडे पैसे नसल्याने मला...'; स्वत:ला संपवण्यापूर्वी 'त्या' पुणेकराचे शेवटचे शब्द title=
पुण्यातील पिंपरीमधील धक्कादायक प्रकार (प्रातिनिधिक फोटो - सौजन्य, रॉयटर्स)

Pune Crime News: पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका तरुण रिक्षाचालकाने आर्थिक विवंचनेमधून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शूट केलेल्या व्हिडीओमध्ये या तरुणाने स्वत:ला का संपवलं आहे याबद्दलचा धक्कादायक खुलासा केला आहे. तसेच आपल्या अंत्यसंस्कारासाठी आपल्या पत्नीकडे पैसे नसणार असा उल्लेखही त्याने या शेवटच्या व्हिडीओत केला आहे. 

व्हिडीओमध्ये काय आहे?

राजू नारायण राजभर असं आत्महत्या करणाऱ्या तरुण रिक्षाचालकांचं नाव आहे. त्याने चिंचवडमधल्या साईनगर भागातील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी राजूने एक व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये राजूने, "मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा," असं म्हणताना दिसत आहे.

थेट या चौघांची नावं घेत केला आरोप

या व्हिडीओमध्ये राजूने कोणते सावकार त्याला त्रास देत आहेत याचाही उल्लेख केला आहे. "रजनी सिंग, राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतोय," असं राजूने या आत्महत्यापूर्वीच्या व्हिडीओत म्हटलं आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्येही राजूने या चौघांचाचा उल्लेख केला आहे. 

माझ्या अंत्यसंस्कारासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नसल्याने...

या व्हिडीओमध्ये राजूने, "माझ्या छोट्या मुलीला सांभाळा, माझ्या अंत्यसंस्कारासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नसल्याने मला इलेक्ट्रॉनिक भट्टीमध्ये जाळा," असं अत्यंत भावनिक आव्हान देखील आत्महत्येपूर्वी केलं आहे. आता या प्रकरणात निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या प्रकरणात पोलिसांनी राजूने आत्महत्येपूर्वी नावं घेतलेल्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्यात रजनी सिंग, राजीव कुमार, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे या चौघांचा समावेश आहे. या चौघांनाही राजूला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या चौघांनी राजूला नेमकं किती कर्ज दिलेलं, ते त्याचा कशाप्रकारे कथित छळ करत होते याचा तपास पोलीस करत आहेत.

(विशेष सूचना - आत्महत्येसंदर्भातील विचार मनात येत असल्यास आयकॉल हेल्पलाइनवर मदत उपलब्ध आहे. 9152987821 या क्रमांकावर इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजरातील, बंगाली, आसामी, पंजाबी आणि मल्याळी भाषेत या वेबसाईटवर मोफत समोपदेशन केलं जातं.)