Lockdownची कसर भरुन करण्यासाठी अती व्यायाम करणारा 'तो' पोहोचला ICUमध्ये

जिम सुरु झाल्यानंतर इतक्या महिन्यांची कसर जिममध्ये भरुन काढण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा.

Updated: Aug 13, 2020, 04:35 PM IST
Lockdownची कसर भरुन करण्यासाठी अती व्यायाम करणारा 'तो' पोहोचला ICUमध्ये
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : अति व्यायाम करणं एखाद्याला आयसीयूमध्येही पोहचवू शकतं, अशाच प्रकारची एक बाब समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे देशात जिम सुरु करण्यास परवानगी नव्हती. देशातील सर्वच जिम बंद होत्या. आता अनलॉकच्या टप्प्यात जिम सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर, आता इतक्या महिन्यांची कसर जिममध्ये भरुन काढण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा. कारण अनेक दिवसांनंतर अति व्यायाम करणं, शरीराला मोठी ईजा पोहचवू शकतं. असंच काहीसं झालंय दिल्लीतील 18 वर्षीय लक्ष्य बिंद्रासोबत...

दिल्लीत राहणारा 18 वर्षांचा लक्ष्य दररोज जिममध्ये जायचा. पण लॉकडाऊन झालं आणि त्याची जिमही बंद झाली. लॉकडाऊन काळात त्याने काही खास व्यायामही केला नव्हता. त्यामुळे हीच कसर भरुन काढण्यासाठी, त्याने जिम सुरु होताच, एका दिवसात महिन्याभराची कसरत करण्याच्या इच्छेने, लक्ष्यच्या किडनीवर इतका वाईट परिणाम झाला की, त्याला रुग्णालयातील आयसीयूमध्ये भरती करावं लागलं.

याबाबत बोलताना लक्ष्यच्या आईने सांगतिलं की, 'व्यायाम करुन आल्यानंतर त्याला काही वेळातच अंथरुणावरुन उठणंही अवघड झालं. 3 दिवस लघवीही न झाल्याने त्याला रुग्णालयात नेलं. त्यावेळी डॉक्टरांनी लक्ष्यच्या किडनीवर परिणाम झाला असून त्याला लवकरात लवकर डायलिसिस करण्याचा सल्ला दिला'.

मॅक्स रुग्णालयातील किडनी ट्रान्सप्लाँट सर्जन डॉ. दिलीप भल्ला यांनी सांगितलं की, 'अचानक अति व्यायाम केल्याने शरीरातून डिहायड्रेशन म्हणजेच पाणी निघून जातं. व्यक्ती त्यानंतरही सतत व्यायाम करतच राहिला तर स्नायूंमध्ये असणारं प्रोटीन तूटू लागतं आणि त्यानंतर याचा किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे जेवण पचणं कठिण होतं आणि यूरीन आऊटपुट संपल्याची स्थिती निर्माण होते. ही स्थिती प्राणघातकही ठरु शकते'.

जिममध्ये व्यायाम जरुर करा. पण एखाद्या महिन्यात व्यायाम करणं बंद झालं असेल, तर पुन्हा सुरुवात करताना केवळ अर्धा तासासाठी हलका व्यायाम करण्यापासून सुरुवात करा, त्यानंतर पुढील काही दिवस हळू-हळू व्यायामाचं प्रमाण वाढवू शकता. तसंच व्यायामापूर्वी आणि नंतर पाणी प्या.