मुंबई : पाणी आपल्या शरीरासाठी अत्यंत गरजेचं आहे. शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी महत्त्वाचं आहे. पण अनेक जणांची पाणी पिण्याची पद्धत, वेळ अतिशय चुकीची असते, ज्याने शरीराला नुकसान होऊ शकतं.
आयुर्वेदानुसार, पाणी कधीही एका घोटातच, एका श्वासात पिऊ नये. कारण पाणी पिताना लाळ पाण्यासह मिसळून शरीरात जाते. लाळ आपली पचनसंस्था मजबूत करण्याचं काम करते. लाळेमध्ये असे काही हेल्दी बॅक्टेरिया असतात, जे पोटासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे पाणी पिताना हळू-हळू, सावकाश पिणं ही योग्य पद्धत मानली जाते.
आयुर्वेद आणि संशोधकांनुसार, पाणी कधीही उभं राहून पिऊ नये. पाणी उभं राहून प्यायल्यास, ते सरळ आणि वेगाने पोटाच्या खालच्या भागात जातं. त्यामुळे शरीराला पाण्याच्या पुरेशा प्रमाणात पोषक तत्व मिळत नाही. उभं राहून पाणी प्यायल्याने गुडघेदुखीची समस्या होऊ शकते. पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. शरीर हायड्रेटेड राहण्यात अडथळे येऊ शकतात.
- पाणी पिताना सरळ बाटलीने न पिता, ग्लासमधून प्यावे. आजारी असल्यास अधिक पाणी प्यावे.
- सकाळी उठल्यानंतर एक ते दोन ग्लास पाणी पिणं, फायदेशीर ठरतं.
- जेवणापूर्वी जवळपास अर्धा तास आधी पाणी प्यावे. त्यामुळे जेवण सहजपणे पचण्यास मदत होते. जेवणानंतर अर्धा तासापर्यंत पाणी पिऊ नये.
- झोपण्यापूर्वी पाणी प्यावे. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होते.
- व्यायाम करण्यापूर्वी आणि व्यायाम केल्यानंतर एक ग्लास पाणी पिण्याने डिहायड्रेशनची समस्या कमी होते. व्यायामानंतर घाम येतो, पाणी त्याची कमतरता भरुन काढतं.