लोकप्रिय अभिनेत्री अमृता सुभाष जी मराठी मालिका, सिनेमा, हिंदी सिनेमा आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्म या सगळ्यात क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत आहे. सातासमुद्रापार स्वतःच्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अमृता सुभाष देखील एकेकाळी नैराश्यात गेली होती? आपलं आयुष्य संपवावं? यासारख्या भावना तिच्या मनात येत होत्या. अशावेळी तिने या सगळ्यावर कशी मात केली हे 'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये अमृता सुभाषने सांगितलं आहे.
अमृता सुभाषचे वडिल सुभाषचंद्र ढेंबरे हे अल्झायमरचे रुग्ण होते. याचा अमृताच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. आपल्या वडिलांनाच हा त्रास का? यासारख्या प्रश्नांनी अमृताला घेरलं होतं. अशा परिस्थितीत ती नैराश्यात गेली. यावेळी विजय तेंडुलकरांनी अमृताला मानसोपचार तज्ज्ञाला दाखवण्याचा सल्ला दिला.
सामान्य व्यक्तीची जी प्रतिक्रिया असेल तीच प्रतिक्रिया अमृताची होती. मी वेडी आहे का? हा टॅबू तिच्या मनात होता. ही परिस्थिती मी माझ्यापद्धतीने हाताळू शकते. मदत घेणे कमीपणाचं वाटत होतं. मला मानसोपचार तज्ज्ञाची काय गरज असा देखील प्रश्न तिला पडायला लागला होता. अनेकदा हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. पण मानसोपचार हे विज्ञान असल्याचं अमृता सुभाष सांगते.
सुरुवातीला होणाऱ्या त्रासाकडे अमृता सुभाष दुर्लक्ष करत होती. पण त्याचवेळी अमृता आणि प्रसाद ओक यांची 'अवघाचि संसार' ही मालिका सुरु होती. या मालिका दरम्यान अमृताला आपल्या या मानसिक परिस्थितीचा परिणाम कामावर होत असल्याचं जाणवू लागलं. तेव्हा तिने मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेतली.
थेरेपी घेतल्यानंतर आयुष्याचा महत्त्वाचा प्रवास सुरु झाल्याचं अमृता सुभाष सांगते. मानसोपचार हे विज्ञान आहे. ही थेरपी घेतल्यानंतर माझ्या आयुष्यात अनेक कवाडं खुली झाल्याचं अमृता सांगते. अमृता करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहे आणि आजही तिला या थेरपीची मदत होत असल्याचं ती सांगतं. विचार बदलायचं सामर्थ्य मानसोपचारामुळे शक्य झाल्याचं अमृता सांगेत.
यावेळी अमृताने 5Senses Excercise शेअर केली. या थेरपीने तुम्ही वर्तमानात राहता. त्यामुळे भूतकाळ आणि भविष्याच्या चिंता-काळजीमध्ये बाहेर पडण्यासही मदत होते. या एक्सरसाईजमुळे तुम्हाला वर्तमानात राहण्यास मदत होते. तसेच आत्मविश्वास वाढून डिप्रेशन कमी होते.