मुंबई : कोरोनाचा कहर संपला नव्हता तोच आता झिका व्हायरसने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. झिका व्हायरसने हळूहळू लोकांना संक्रमित करण्यास सुरुवात केली आहे. मात्र झिका व्हायरस म्हणजे काय, त्याची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंध काय, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. जाणून घेऊया या प्रश्नांची उत्तरं
झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये ताप येणं, अंगदुखी, डोळे येणं, अंगावर पुरळ येणं, सांधेदुखी अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. डास चावल्यावर आठवड्यानंतर झिका व्हायरसची लक्षणं आढळून येतात. झिकाच्या संसर्गानंतर गुलेरियन बॅरी सिंड्रोम, एक गंभीर ऑटोइम्यून डिसऑर्डर होत असल्याची नोंद करण्यात आलीये.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, युगांडाच्या जंगलात 1947 साली पहिल्यांदा झिका व्हायरस सापडल्याची नोंद आहे. तेव्हा माकडांमार्फत माणसांना व्हायरसची लागण झाल्याची नोंद आहे.
झिका विषाणू प्रामुख्याने एडीस डासांच्या प्रजातीमुळे पसरतो. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींना डास चावल्यानंतर त्यांच्यामार्फत विषाणूची लागण होते. त्यानंतर हा डास इतर लोकांना चावल्यास हा व्हायरस पसरतो. ब्लड ट्रान्सफ्युजनमधूनही झिका व्हायरस पसरण्याची शक्यता आहे.
झिका व्हायरसवर अजूनही कोणते उपचार उपलब्ध नाहीयेत. झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांला डॉक्टर ताप किंवा डोकं दुखीसाठीच्या औषधाची शिफारस करतात. त्याचप्रमाणे अधिक आराम करण्याचा सल्ला देतात.
सामान्यपणे डास हे साचलेल्या पाण्यात असतात. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे अशा जागा वेळच्यावेळी स्वच्छ करा. तसंच, रात्री झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करा. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी.