Booster Dose च्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक, एका मिनिटात होऊ शकतं तुमचं बँक खातं रिकामं

कोरोना बूस्टर डोसच्या नावाखाली ऑनलाइन हॅकर्स सक्रिय झाले आहेत

Updated: Jan 6, 2022, 05:56 PM IST
Booster Dose च्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक, एका मिनिटात होऊ शकतं तुमचं बँक खातं रिकामं title=

Covid-19 Booster Dose : देशात कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग झपाट्याने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर ज्यांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतलेली नाही त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी असं आवाहन केंद्र आणि राज्य सरकारकडून केलं जात आहे. नुकतंच सरकारने 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचं लसीकरण सुरू केलं आहे. 

अनेक राज्यांमध्ये सरकार लोकांना कोविड लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) घेण्यास सांगत आहे. पण याचा काहीजण गैरफायदा घेत असून बूस्टर डोस देण्याच्या नावाखाली लोकांना ऑनलाईन गंडा (Online Fraud) घालण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. 

बूस्टर डोसच्या नावाने गंडा
बूस्टर डोस देण्याच्या नावाखाली सायबर ठग (cyber thugs) सर्वसामान्य लोकांना फोन करुन नोंदणी करण्यास सांगतात. रजिस्ट्रेशन करायचं असल्याचं सांगून तुमच्या आधार कार्ड (Aadhar Card), पॅनकार्डची (Pan Card) माहिती घेतात. तसंच तुमच्या मोबाईलवर येणारा ओटीपी (OTP) क्रमांक विचारतात आणि याद्वारे तुमच्या बँक खात्यातील रक्कम ते लंपास करतात. 

लिंक पाठवूनही फसवणूक
कोरोनाच्या नवीन केसेसमध्ये वाढ झाल्यामुळे तज्ज्ञ आता बूस्टर डोस फायदेशीर मानत आहेत. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेण्याचा प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे ते लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. सध्या बुस्टर डोस देण्याच्या नावाखाली फसवणुकीची अनेक प्रकरणे ऐकायला मिळत आहेत. 

कोरोना लस आणि बूस्टर डोसचे बनावट संदेश आणि लिंक पाठवून बँक तपशील, ओटीपी क्रमांक घेऊन खात्यातून पैसे काढतात. अशा परिस्थितीत लोकांनी त्यांचा ओटीपी क्रमांक, खाते क्रमांक किंवा इतर माहिती कोणाशीही शेअर करू नये, असं आवाहन सायबर तज्ज्ञांनी केलं आहे. 

कोणतीही माहिती देऊ नका
अनोळखी नंबरवरून येणाऱ्या मेसेजला रिप्लाय देऊ नका, असं तज्ज्ञांचं म्हणणे आहे. CVV, OTP आणि क्रेडिट कार्ड क्रमांक कोणाशीही शेअर करू नका. तुमचा वैयक्तिक तपशील आणि आधार क्रमांक कोणाशीही शेअर करू नका. फसवणूक टाळण्यासाठी सर्वसामान्यांनीही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

बूस्टर डोससाठी कोविन अॅप
ग्राहकांनी त्यांच्या बूस्टर डोसच्या नोंदणीसाठी कोणतेही अॅप डाउनलोड करू नये. लस घेण्यासाठी कोविनवर (CoWIN) जशी नोंदणी केली जाते किंवा तुम्ही थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेता, तशीच प्रक्रिया बूस्टर डोससाठी केली जाईल. सरकार तुम्हाला कोणतंही थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करण्यास सांगत नाही. तुम्ही अशा कोणत्याही एसएमएस/कॉलबाबत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण ते तुमचे बँक खाते एका मिनिटात रिकामं करू शकतात.