मुंबई : कोरोनाने गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं आहे. नव्या येणाऱ्या व्हेरिएंटमुळेही तज्ज्ञ चिंतेत असून विविध प्रकारचा शोध घेतायत. मात्र नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, अमेरिकन शास्त्रज्ञांनी असं एक कोटिंग तयार केलं आहे जे कोणत्याही कपड्यावर लावल्यास कोरोना व्हारयस 90 टक्के निष्फळ ठरू शकतो.
या संशोधनाबाबत असं सांगण्यात आलं आहे की, कोटिंगमध्ये असे मॉलिक्यूल असतील, ज्यावर प्रकाश पडेल तेव्हा ऑक्सिजनचे स्टर्लाइजिंग स्वरूप रिलीज होतील. भविष्यात या कोटिंगचा वापर अँटीव्हायरल स्प्रे म्हणूनही केला जाऊ शकतो, असा दावाही करण्यात येतोय.
दरम्यान हे मानवांसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचं संशोधनात सांगण्यात आलं आहे. तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, या कोटिंगमध्ये असे अंटीवायरल गुणधर्म आहेत की त्याचा मानवांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. तसंच हे सूक्ष्मजंतू कपड्यांवर चिकटतही नाहीत. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी फक्त एक तास लागतो आणि हे देखील सामान्य तापमानात केलं जाऊ शकतं.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूस, पॉलिस्टर, डेनिम आणि सिल्क यांसारख्या कपड्यांवर या कोटिंगचा वापर केला जाऊ शकतो. यामुळे कोरोनाचा धोका देखील खूप कमी होऊ शकतो आणि माणसांना कोणतंही नुकसान होणार नाही.
संशोधनात असंही म्हटलं आहे की, रुग्णालयासाठी फॅब्रिक तयार करणाऱ्या अनेक कंपन्या या कोटिंगचा वापर करण्यास इच्छुक आहेत. अशा परिस्थितीत ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने अमेरिकेत पेटंटसाठी अर्ज केला आहे.