ब्रिटन : कोरोनाने संपूर्ण जगात थैमान माजवलं असून कोरोना व्हायरसमुळे अनेकांचा बळी गेला आहे. मात्र कोरोनामुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर...हो हे खरं आहे...ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा जीव चक्क कोरोना व्हायरसमुळे वाचला आहे.
ब्रिटनच्या Ellesmere Port मध्ये राहणारी जेम्मा फैलून हिच्या म्हणण्याप्रमाणे कोरोनामुळे तिचे प्राण वाचले आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर ती या व्हायरसशी झुंज देत होती. यानंतर जेम्मा डॉक्टरांकडे चाचणीसाठी गेली होती.
डॉक्टरांनी जेम्माला काही चाचण्या करण्यास सांगितल्या. या तपास अहवाला दरम्यान, तिला थायरॉईड आणि किडनी कॅन्सर असल्याचं आढळून आलं. तीन मुलांची आई असलेली जेम्मा म्हणते की, जर कोरोना झाला नसता तर ती डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली नसती. चाचण्या न करणं तिच्यासाठी घातक ठरू शकलं असतं.
41 वर्षीय जेम्मा यांनी सांगितले की, गेल्या वर्षी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतरही तिला घसा दुखू लागला होता. त्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली. घशाचा त्रासासोबत तिला पाठदुखीचाही सामना करावा लागला होता.
डेली मेलच्या अहवालानुसार, जेम्मा म्हणाली की, हे सांगणं खूप विचित्र आहे, पण कोरोनाने माझे प्राण वाचवले. जेमा आता स्वतःला खूप भाग्यवान समजते. कॅन्सरच्या गाठी काढण्यासाठी आतापर्यंत तिच्या तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत.