Omicron Update : देशात ओमायक्रॉनची (Omicron) वाढती प्रकरणे पाहता WHO लोकांना वारंवार सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करत आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडनोम यांनी लोकांना ओमायक्रॉनबाबत धोक्यांचा इशारा दिला. टेड्रोस म्हणाले की कोविड -19 चा ओमायक्रॉन प्रकार अतिशय धोकादायक आहे.
ओमायक्रॉन डेल्टापेक्षा (Delta) कमी गंभीर असला तरीही हा धोकादायक विषाणू आहे. विशेषत: ज्यांनी लसीकरण केलं नाही, त्यांच्यासाठी हा विषाणू अधिक धोकादायक ठरू शकतो. कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण हे प्रमुख शस्त्र आहे. पण अजूनही असे अनेक जण आहेत ज्यांनी लस घेतलेली नाही.
आफ्रिकेत, 85 टक्क्यांहून अधिक लोकांना अद्याप लसीचा डोस मिळालेला नाही. जोपर्यंत आम्ही ही लसीतील तफावत दूर करत नाही तोपर्यंत आम्ही साथीच्या रोगाचा अंत करू शकत नाही, असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे.
जगातील प्रत्येक देशाने सप्टेंबर 2021 च्या अखेरीस आपल्या लोकसंख्येच्या 10 टक्के, डिसेंबरच्या अखेरीस 40 टक्के आणि 2022 च्या मध्यापर्यंत 70 टक्के लसीकरण करावे अशी अपेक्षा होती. पण 90 देश अजूनही 40 टक्क्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, त्यापैकी 36 देश अजूनही 10 टक्के लसीकरणही करु शकलेले नाहीत. जगभरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलेले बहुतेक लोक असे आहेत ज्यांना लस मिळालेली नाही अशी माहिती ट्रेडोस यांनी दिली.
लसीकरणामुळे मृत्यूचा धोका कमी
लसीकरणामुळे संसर्गाचा प्रसार पूर्णपणे थांबत नसला तरी मृत्यूचा धोका कमी करण्यास मदत करतं, असं ट्रेडोस यांनी म्हटलं आहे.
आणखी व्हेरिएंटची भीती
डब्ल्यूएचओ प्रमुख ट्रेडोस यांनी कोरोनाचे आणखी व्हेरिएंट येण्याची भीती व्यक्त केली आहे. जे व्हेरिएंट ओमायक्रॉनपेक्षा वेगाने पसरु शकतात आणि अधिक प्राणघातक असू शकतात. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दर आठवड्याला सुमारे 50,000 झाली आहे.