मुलांच्या बौध्दीक आणि शारीरीक विकासाकरिता 'या' गोष्टी करा

असे केल्यास मुलं आजारी पडत नाहीत आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते 

Updated: Sep 21, 2020, 04:01 PM IST
मुलांच्या बौध्दीक आणि शारीरीक विकासाकरिता 'या' गोष्टी करा  title=

मुंबई : वयाची पहिली दहा वर्षे आहारात वयाप्रमाणे प्रथिने (प्रोटिन्स), कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स), गरजेचं ओमेगा फॅटी अॅसिड्स, जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स), क्षार (मिनरल्स) यांची गरज असते. म्हणूनच आहारामध्ये दूध, कडधान्ये, फळे, भाज्या, अंडी यांचा समावेश असावा. आहार योग्य नसला, तर अॅनेमिया होतो आणि बौद्धिक वाढ मंदावते. विशेषत: मुलांची पहिली दहा वर्षं पालकांनी त्यांच्या आहाराकडे नीट लक्ष दिलं, तर मुलांची वाढ चांगली होते. त्यांच्यात कमतरता निर्माण होत नाही. मुलं मग आजारी पडत नाहीत आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते अशी माहिती मदरहुड हॉस्पीटलचे बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ. पीयुष रणखांब यांनी दिली.

आहारात कर्बोदकांचा समावेश करा: कार्बोहायड्रेटस शरीरात उपस्थित असलेल्या सर्व पेशींसाठी एक उर्जा स्त्रोत आहे. कार्बोहायड्रेट हे एरिथ्रोसाइट्स आणि सीएनएससाठी उर्जेचे प्राथमिक स्त्रोत आहेत. १ ग्रॅम कर्बोदकांपासून ४.१ कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणून त्यांना ‘शरीराचे इंधन‘ असे म्हणतात. आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेपैकी सुमारे ६५ ते ८० टक्के ऊर्जा कर्बोदकांतून मिळते.आपण खालेल्या कर्बोदकांपैकी गरजेपेक्षा जास्तीच्या कर्बोदकांचे रूपांतर ‘ग्लायकोजन’ मध्ये होऊन ते यकृत पेशींमध्ये साठवले जाते किंवा मेद-उतींमध्ये (Adipose Tissues) मेदाच्या स्वरूपात साठविली जातात. अशा प्रकारे  फळं ही कार्बोहायड्रेट्सचे चांगले स्त्रोत आहेत आणि यामध्ये जीवनसत्त्वे आणि फायबरचे प्रमाणही अधिक असते. फळांच्या रसाऐवजी संपूर्ण फळे शक्यतो मुलांना द्यावीत.

प्रथिने - आपल्या शरीराच्या पेशींच्या जडण- घडणीमध्ये प्रथीनेच सर्वाधिक उपयोगी पडतात. चयापचयाचा वेग, शरीराच्या वाढीचा वेग यांवर नियंत्रण ठेवून विकास नियंत्रित करणे, अशी प्रमुख कामे करणाऱ्या प्रथिनांना संप्रेरक प्रथिने असे म्हणतात. प्रथिने हि अमिनो आम्लांपासून बनलेली असतात.आहारात शेंगदाणे, मका, ताज्या भाज्या आणि फळं यासारखे पदार्थांचा समावेश करा.  दुधातही पुरेसे प्रथिने असतात त्यामुळे मुलांच्या आहारात दुधाचा समावेश करा.

स्निग्ध पदार्थ : 2 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये मज्जासंस्था विकासाकरीता फॅटी एसिडची आवश्यकता असते. फॅट्स हे विरघळणारे जीवनसत्त्वे शोषण्यास देखील मदत करते. मुलांच्या बौध्दीक विकासासाठी देखईल आहारातील फॅट्स महत्त्वपूर्ण आहेत. आहारात चांगल्या प्रतीच्या फॅट्सचा समावेश करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कॅल्शियम आणि लोह: योग्य कॅल्शियमचे सेवन केल्याने मुलांच्या हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत. आपल्या मुलाच्या आहारात आपण टोफू, हिरव्या पालेभाज्या, नाचणी आणि तीळ यांचा समावेश करू शकता. लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा आणि न्यूरो-कॉग्निटिव्ह सारखी समस्या जाणवू शकते. आपल्या मुलांच्या आहारात लोहयुक्त पदार्थ तसेच अंडी, मासे, सोयाबीनचे आणि शेंगदाणे या पदार्थांचा समावेश करा.

अ व ड जीवनसत्व : शरीराची वृद्धी – पेशी विभाजन आणि पेशी विभेद या क्रियांमध्ये अ जीवनसत्वाचा महत्वाचा सहभाग आहे. रात्रीच्या दृष्टीसाठी आवश्यक. दृष्टीपटलामधील दंडपेशी आणि शंकु पेशींमधील प्रकाशसंवेदनशील अशा रोडॉपसीन (Phodopsin) या रंगद्रव्याची निर्मिती अ जीवनसत्वापासून होते. त्वचा, श्लेष्मल आवरण, दात व हाडे, मेंदू, दृष्टी इ. च्या निर्मिती व आरोग्यासाठी आवश्यक आहे. शरीराची वृद्धी , शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसचे योग्य प्रमाण राखण्यासाठी ड जीवनसत्व अत्यंत महत्वाचे आहे. हाडांच्या मजबूतीसाठी ड जीवनसत्व आवश्यक आहे. आ जीवनसत्व अभावी मुडदूस रोग होऊ शकतो.