मुंबई : कान हा आपल्या शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, ज्यामुळे आपल्याला संवाद करण्यासाठी मदत होते, कारण समोरील व्यक्ती आपल्याशी काय बोलतोय? किंवा कोणत्या विषयावर बोलतोय, हे आपल्याला ऐकायला येते. परंतु असे असले तरी, अनेक लोक आपल्या कानाची योग्यती काळजी घेत नाहीत. बरेच लोक आपलं कान साफ करण्याच्या नावाखाली आपल्या कानात कधी पिन, तर कधी काडी, तर काही लोक बड्स घालतात. परंतु तुम्हाला माहितीय का असं करुन तुम्ही स्वत:चंच नुकसान करताय.
कानात जमा होणाऱ्या या मळाला इअर वॅक्स म्हणतात. हे कानात का असतं? आणि याचे फायदे काय? जाणून घ्या.
इअर वॅक्समध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात जे कान स्वच्छ करण्यास मदत करतात, ते कानाचे संरक्षण करते आणि ते कानाला कोरडे होऊ देत नाही. जेव्हा बाहेर हवेमुळे धूळ उडते, तेव्हा हे कानातले मेण ती घान आपल्या कानात शिरण्यापासून रोखते. याशिवाय पोहताना किंवा अंघोळ करताना हे वॅक्स आपल्या कानात पाणी जाऊ देत नाही.
हे समजून घ्या की, जर हा इअर वॅक्स तुमच्या कानात नसेल, तर तुमच्या कानाला इजा होऊ शकते. त्यामुळे त्याला काढण्याची चूक तुम्ही कधीही करु नका.
कानातले मेण काढताना अनेकजण लाकूड, लोखंड किंवा कोणतीही तीक्ष्ण वस्तू वापरतात, परंतु यामुळे कानाचे नुकसान होते. असे केल्याने कानाचा मेण बाहेर येण्याऐवजी आणखी आत जातो. ज्यामुळे संसर्गा वाढण्याचा धोका वाढतो. तसेच यामुळे तुमच्या कानाच्या मेणात साचलेली धूळ ही कानात जाते. ज्यामुळे कानाला धोका वाढतो.
याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तीक्ष्ण वस्तूंमुळे कानाचा पडदा फाटू शकतो आणि ऐकण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते.
हे लक्षात घ्या की हे इयरवॅक्स कानांना हानी पोहोचवत नाही, म्हणून सहसा ते बाहेर काढण्याची गरज नसते. जर कानात खूप मेणाने भरलेले असेल, ज्यामुळे ऐकण्याच्या समस्या सुरू झाल्या असतील, तरी देखील तुम्ही स्वत: कान साफ करू नका आणि त्वरित कानाच्या तज्ञाशी संपर्क साधा.
कान स्वच्छ करण्यासाठी तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नये हे बहुतेकांना माहिती आहे, पण अनेकांच्या मनात असा प्रश्न उपस्थीत होतो की, मग कॉटन इअर बड्स किती सुरक्षित आहेत? परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या मते, असं केल्यामुळे समस्या दूर होण्याऐवजी कानात जखम होण्याचा धोका अधिक वाढतो.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)