तुम्ही किती कप चहा-कॉफी पिताय? अतिरीक्त कॅफेनचं सेवन डोळ्यांसाठी धोकादायक!

जास्त चहा आणि कॉफीचं सेवन आपल्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं.

Updated: Jun 19, 2021, 09:36 AM IST
तुम्ही किती कप चहा-कॉफी पिताय? अतिरीक्त कॅफेनचं सेवन डोळ्यांसाठी धोकादायक! title=

मुंबई : कामाच्या वेळी सुस्ती दूर करण्यासाठी आपण बर्‍याचदा चहा-कॉफीचं सेवन करतो. परंतु आता एका अभ्यासानुसार असं दिसून आलं आहे की, जास्त चहा आणि कॉफीचं सेवन आपल्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं. डोळ्यांचं हे नुकसान चहा आणि कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे होतं.

काय आहे हा अभ्यास?

न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई इथल्या आयकॉन स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. हे संशोधन ऑप्थेलमोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झालं आहे. या संशोधनात असं सांगितलं गेलं आहे की, अत्यंत प्रमाणात कॅफेनचा सेवन केल्याने ग्लूकोमा होण्याचा धोका वाढू शकतो.

संशोधनानुसार, ग्लूकोमा म्हणजेच काचबिंदूचं कारण आपल्या खाण्याच्या सवयी आणि अनुवांशिकता देखील असू शकते. संशोधकांनी असं सुचवलं आहे की, ज्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना काचबिंदू आहे त्यांनी कॅफेनचा वापर कमी करावा.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, डोळ्यामध्ये एक्वीस ह्युमर नावाचा द्रवप्रकार असतो. सामान्यत: हा द्रव ट्रैब्युलर मेशवर्क नावाच्या ऊतीद्वारे डोळ्याबाहेर पडतो. कॅफेनमुळे या द्रवाचं उत्पादन अधिक होतं आणि डोळ्यांवर दबाव वाढतो. या दाबमुळे आपल्या डोळ्यांच्या ऑप्टिकल नसा खराब होऊ शकतात. ज्यामुळे आपली दृष्टी कमजोर होऊ शकते.

दरम्यान आणखी एक कारण म्हणजे चहा आणि कॉफीचे अतिसेवनाने रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे दृष्टी अंधुक होते. कॅफेनचा थेट काचबिंदूशी संबंध नाही. परंतु डोळ्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते ज्यामुळे काचबिंदू होण्याचा धोका वाढतो.

या संशोधनासाठी संशोधकांनी यूके बायोबँकमध्ये उपस्थित असलेल्या एक लाख 20 हजार लोकांच्या डेटाचं विश्लेषण केलं. यामध्ये 39 ते 73 वर्षे वयोगटातील लोकांचा समावेश केला गेला. या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, जास्त प्रमाणात कॅफेनच्या वापरामुळे ताण वाढतो परिणामी काचबिंदूचा धोका वाढतो.

अभ्यासानुसार असंही म्हटलंय आहे की, 480 मिलीग्रामपर्यंत कॅफेनचं सेवन ठीक आहे, परंतु त्याहून अधिक धोकादायक आहे. दुसरीकडे, ज्या लोकांना काचबिंदूचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांच्यासाठी सामान्य मात्रा 320 मिलीग्राम आहे. याचा अर्थ असा की, दिवसातून 4-5 कप कॉफी किंवा चहा पिणं धोकादायक आहे.

यासंदर्भात माहिती देताना पुण्यातील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रकाश मराठे म्हणाले, "चहा आणि कॉफीचं अतिसेवन घातक ठरू शकतं. यामुळे अनेक समस्या उद्धवू शकतात. या अनेक समस्यांमधील एक म्हणजे काचबिंदू. मात्र अनेकवर्ष कॅफेनचं अतिसेवन होत असेल तर डोळ्यांसंबंधी समस्या उद्भवू शकते."