पतीच्या मानसिक आरोग्यासाठी अनैतिक संबंधांचे खोटे आरोप घातक - कोर्ट

एखादी पत्नी जर पतीला सातत्याने आत्महत्या करण्याची धमकी देत असेल तर, अशा पत्नीसोबत राहणेही धोकादायक आहे

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Mar 5, 2018, 09:07 AM IST
पतीच्या मानसिक आरोग्यासाठी अनैतिक संबंधांचे खोटे आरोप घातक - कोर्ट title=

नवी दिल्ली : पतीचे कोणा दुसऱ्या व्यक्तिसोबत अनैतिक संबंध असल्याचा खोटा आरोप एखादी पत्नी सातत्याने करत असेल तर, हा प्रकार गंभीर आहे. अशा आरोपांमुळे पतीच्या मानसिक आरोग्याला धोका पोहोचू शकतो. तसेच, एखादी पत्नी जर पतीला सातत्याने आत्महत्या करण्याची धमकी देत असेल तर, अशा पत्नीसोबत राहणेही धोकादायक आहे, असे स्पष्ट मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

असे आरोप त्याच्या दु:खाचे कारण

एकमेकांपासून वेगवेगळे राहणाऱ्या एका जोडप्याला तलाकसाठी मान्यता देताना कौटुंबिक न्यायालयाने हे मत नोंदवले आहे. या प्रकरणात पतीने आपल्या पतीबद्धल तक्रार केली होती. यात तिने पतीवर गंभीर आरोप केले होते. न्यायालयाने म्हटले की, आम्हाला असे जाणवले आहे की, सातत्याने पतीवर अनैतिक संबंधांबाबतचा खोटा आरोप करणे हे पतीसाठी मानसिकदृष्ट्या धोकादायक आहे. हे आरोप त्याच्या दु:खाचे कारण ठरू शकतात.

आरोपांमुळे व्यक्तिवर गंभीर आघात

न्यायमूर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्यायमुर्ती दीपा शर्मा यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, 'असा प्रकारचे आरोप हे गंभीर स्वरूपाचे असतात. या आरोपांचा शेवट हा नात्यात दूरावा येण्यात होतो. या आरोपांमुळे व्यक्तिवर गंभीर आघात होतो. तसेच, आत्महत्येची धमकी देणाऱ्या पत्नीसोबत राहणेही त्याच्यासाठी धोकादायक बनते.'

दरम्यान, ज्या प्रकरणात न्यायालयाने हे मत व्यक्त केले त्या प्रकरणात एका महिलेने आपल्या पतीविरूद्ध न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत आपल्या पतीचे आपल्या बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता.