दिल्ली : कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणं 185 देशांमध्ये नोंदवली गेली असल्याचं समोर आलंय. जागतिक आरोग्य संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं असंही म्हटलं आहे की, गेल्या आठवड्यात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पहिल्या आठवड्यात जगभरात 40 लाख नवीन प्रकरणं नोंदवली गेली आणि या आठवड्यात फक्त 36 लाख नवीन प्रकरणं आली.
सध्या, अल्फा, बीटा आणि गामांपैकी प्रत्येकी एक टक्क्यापेक्षा कमी आहे असं, जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड 19 ची प्रभारी तांत्रिक प्रमुख मारिया वान केरखोव यांनी डब्ल्यूएचओच्या सोशल मीडिया लाइव्ह संभाषणादरम्यान सांगितलं. डेल्टा व्हेरिएंटने अलीकडच्या काळात जगभरात कहर केला आहे आणि ते अधिक पारगम्य आहे. हा एक प्रकारे इतर व्हेरिएंटशी स्पर्धा करतोय आणि इतर व्हायरसची जागा घेत आहे.
दरम्यान, युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने एटा (81 देशांमध्ये आढळला), इओटा (कमीतकमी 49 देशांमध्ये नोंद केली आहे) आणि कप्पा असं (57 देशांमध्ये पसरला) वर्गीकरण केलं आहे. वीओआई एटा (b.1.525), इओटा (b.1.526) आणि कप्पा (b.1.617.1) पूर्वीच्या वीओआई म्हणून पुन्हा वर्गीकृत करण्यात आले आहेत, असं आरोग्य संस्थेने सांगितले. आता यांचं मूल्यांकन देखरेखीअंतर्गत व्हेरिएंटच्या रूपात केलं जाईल.
हे संशोधन जगातील बहुतांश क्षेत्रांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा वेगवान प्रसार आणि सध्याचे वर्चस्व दाखवतं. अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या एका नवीन अहवालानुसार, टेक्सास फेडरल कारागृहात वेगाने पसरत असलेल्या डेल्टा व्हेरिएंटने लस न घेतलेल्या आणि पूर्णपणे लसीकरण झालेल्या दोन्ही लोकसंख्येला संक्रमित केलं आहे.