छोट्याशा वेलचीचे मोठे फायदे!

आपले मसाल्याचे पदार्थ तसे औषधीच. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 17, 2018, 03:58 PM IST
छोट्याशा वेलचीचे मोठे फायदे! title=

मुंबई : आपले मसाल्याचे पदार्थ तसे औषधीच. त्यातील छोटीशी वेलची पदार्थाला स्वाद येण्यासाठी वेलची हमखास वापरली जाते. मात्र ही छोटीशी वेलची फक्त पदार्थाला स्वाद आणत नाही तर आरोग्यासाठी फायदेशीरही ठरते.

१. आजकालच्या जीवनशैलीमुळे हृदयविकार सामान्य झाला आहे. पण हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी वेलची अत्यंत उपयुक्त ठरते. त्याचबरोबर वेलचीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशिअम यांसाऱखे पोषकघटक असतात. त्यामुळे वेलचीच्या सेवनाने हे घटकही शरीरास प्राप्त होतात.

२. आयुर्वेदानुसार वेलची नैसर्गिकरीत्या उष्ण असते. त्यामुळे शरीराला उष्णता मिळते. तसंच फुफ्फुसांमधील रक्तसंचार सुरळीत होण्यास मदत होते. अस्थमा, सर्दी-खोकला या आजारांवरही वेलची लाभदायी ठरते.

३. शरीरातील विषद्रव्ये (टॉक्झिन्स) दूर होण्यास वेलची फायदेशीर आहे. यासाठी दररोज वेलचीचे सेवन करता येणे शक्य नसेल तर आठवड्यातून ३-४ वेळा तरी अवश्य वेलचीचा आहारात समावेश करा.

४. आरोग्याच्या अनेक समस्या उच्च रक्तदाबामुळे सुरू होतात. पण चांगली बाब ही की रक्तदाब नियंत्रित करण्यास वेलची महत्त्वाची ठरते. 

५. वेलची एक उत्तम माऊथ फेशनर आहे. तोंडाला येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी वेलची चघळा.

६. प्रवासात उलटीसारखे वाटत असल्यास तोंडात वेलची टाका. मग तुमचा प्रवास एकदम मस्त होईल.

७. नशा करण्याची सवय असल्यास ती सोडण्यासाठी देखील वेलची उपयुक्त ठरते. यासाठी तुम्हाला फक्त वेलची चघळायची आहे. यात असलेल्या पोषकतत्त्वांमुळे तणाव कमी करण्यास मदत होते.