कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचं थैमान, आरोग्य आणीबाणी जाहीर... 'ही' आहेत लक्षणं

Mpox Symptoms : कोरोनाच्या महामारीतून जग अद्याप पुरतं सावरलं नसताना आता नव्या आजाराचं संकट उभं ठाकलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

राजीव कासले | Updated: Aug 16, 2024, 07:10 PM IST
कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचं थैमान, आरोग्य आणीबाणी जाहीर... 'ही' आहेत लक्षणं title=

Mpox Symptoms : कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला सहन करावा लागला. कोरोनाने (Corona) जगभरात करोडो लोकांचा जीव घेतला. अनेक संसार उद्ध्वस्त झाले. अनेक उद्योगधंदे बंद झाले, लाखो लोकं बेरोजगार झाली. कोरोनाने दिलेल्या या जखमा कधीच भरून निघणाऱ्या नाहीत. यातून हळहळू सावरत असतानाच आता नव्या आजाराचं संकट उभं ठाकलं आहे. जगभरात सध्या मंकीपॉक्स (MonkeyPox) आजाराने सध्या थैमान घातलं आहे. याचा सर्वाधिक प्रभाव आफ्रिकेत जाणवतोय. चिंतेची गोष्ट म्हणजे आता आशियातही या आजाराने हातपाय पसरयला सुरुवात केली आहे. पकिस्तानमध्ये मंकिपॉक्स व्हायरसचा पहिलं प्रकरण समोर आलं आहे. हा धोका लक्षात घेता भारतातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मंकीपॉक्स कशामुळे होतो, लक्षणं काय?
मंकीपॉक्स व्हायरस हा उंदिर आणि इतर काही प्राण्यांमुळे माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. या आजारात ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे,  त्वचेवर पुरळ येणे अशी लक्षणं दिसतात. बहुतेक प्रकरणांमध्ये हा रोग आपोआप बरा होतो, पण  काही प्रकरणांमध्ये हा आजार गंभीर रुप धारण करु शकतो.

पाकिस्तानात पहिलं प्रकरण
पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने मंकिपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्याचं स्पष्ट केलं आहे. बाधित व्यक्ती नुकतीच आखाती देशातून पाकिस्तानात परतली होती. बाधित व्यक्तीतमध्ये मंकिपॉक्सचा कोणता व्हेरिएंट आढळला याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. याआधी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातही मंकिपॉक्सचे तीन संशयीत रुग्ण आढळले होते. 

भारतात अलर्ट
मंकिपॉक्सचा धोका लक्षात घेता भारत सरकार अलर्ट मोडवर आलंय. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी घोषित केली आहे. भारताच्या तामिळनाडू राज्याने विमानतळ आणि आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क राहाण्याचे आदेश दिले आहेत. बाहेरच्या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचं स्क्रिनिंग केलं जात आहे. विशेषत: आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांची संपूर्ण आरोग्य चाचणी केली जात आहे. 

मंकीपॉक्सची लक्षणं दिसताच, तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वत:ला इतरांपासून वेगळं ठेवा आणि मास्कचा वापर केला. बाधित व्यक्तीचे कपडे, अंथरुन आणि इतर सामान  वेगळं ठेवा.