Diabetes Risk: दिवसभर काम करून थकवा आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीसाठी आराम हा गरजेचा असतो. आपल्या आरोग्यासाठी झोप ही फार गरजेची असते. आपल्या शरीरासाठी झोप ही फार महत्त्वाची असते. पण तुम्हाला माहितीये निद्रानाश किंवा झोपेचा त्रास मधुमेहाचा धोका वाढवू शकतो? एका नवीन अभ्यासात असं आढळून आलंय की, की ज्या लोकांच्या झोपेच्या कालावधीत वारंवार बदल होत असतात त्यांना मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
अभ्यासानुसार, ज्या लोकांचा झोपेचा कालावधी सरासरी 31 ते 45 मिनिटांपर्यंत बदलतो. या व्यक्तींमध्ये मधुमेहाचा धोका 15% वाढल्याचं दिसून आलं. त्याच वेळी, ज्या लोकांच्या झोपेचा कालावधी एका तासापेक्षा जास्त असतो, त्यांच्यामध्ये हा धोका 59 टक्क्यांनी वाढल्याचं पाहायला मिळालं. हा अभ्यास UK Biobank मधील 84,000 हून अधिक व्यक्तींना यामध्ये सहभागी करण्यात आलं होतं. सहभागींनी सात रात्री एक एक्सेलेरोमीटर घातला, ज्यामुळे त्यांच्या झोपण्याच्या पद्धतींचे परीक्षण केलं जाऊ शकतं.
या अभ्यासात असंही म्हणण्यात आलंय की, जे लोक कमी किंवा जास्त झोपतात त्यांना मधुमेहाचा धोका वाढतो. जास्त झोपलेल्या लोकांमध्ये हा धोका 34% वाढल्याचं पाहायला मिळालं. झोपेची कमतरता आणि मधुमेह यांच्यातील संबंध दर्शविणारा हा पहिला अभ्यास नाही. गेल्या काही वर्षांत, अनेक अभ्यासांनी हे सिद्ध झालं आहे की, झोपेच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, नैराश्य आणि हृदयविकार यासारख्या समस्यांचा धोका वाढतो.
जर तुम्हालाही झोपेच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. नियमित झोप येण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता, जसं की, झोपण्याची ठराविक वेळ ठेवणं, झोपण्यापूर्वी फोनचा वापर कमी करणं आणि झोपण्यासाठी आरामदायक वातावरण तयार करणं. जर तरीही तुम्हाला झोपेच्या समस्या जाणवत असतील तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)