अमेरिका : दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होत असल्यास बरगड्या दुखतात हे अनेकांनी अनुभवलं असेल पण सतत खोकल्याने हाड तुटल्याची एक घटना अमेरिकेत घडली आहे.
अमेरिकेतील मैसाचुसेट्स येथे एका महिलेचं खोकताना चक्क हाड मोडल्याची घटना समोर आली आहे. काही वेळाने त्या महिलेच्या त्वचेवर मोठा काळा डाग निर्माण झाला. तेव्हा डॉक्टरकडे धाव घेतल्यानंतर हाड मोडल्याची घटना समोर आली आहे.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडेसिनमध्ये छापण्यात आलेल्या रिपोर्ट्सनुसार, मैसाचुसेट्स येथे राहणार्या 66 वर्षीय महिलेला अनेक दिवसांपासून खोकल्याचा त्रास होता. त्यावर काही उपाचारही सुरू होते. परंतू खोकल्याचा त्रास कमी होत नव्हता.
एकेदिवशी घसा मोकळा करण्यासाठी ती जोरात खोकली.काही दिवसांनी तिच्या एका कुशीत दुखायला लागले. हळूहळू पोटाजवळच्या भागावर काळा डाग वाढायला सुरूवात झाली.
एक्स रे काढल्यानंतर त्या महिलेच्या बरगडीतील नववे हाड मोडल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. इतर हाडंदेखील कमजोर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोबतच या महिलेच्या छातीवर हर्निया वाढत होता.
बोर्डेटेल्ला परट्यूसियाचा जीवाणू शरीरात पसरल्याने खोकल्याचा त्रास वाढतो. या त्रासादरम्यान हाडांवर परिणाम होतो. त्यामध्ये वेदना जाणवतात.