मुंबई : मानवी रक्तामध्ये पहिल्यांदाच मायक्रोप्लास्टिकचे अवशेष आढळून आले आहे. चाचणी केलेल्या जवळजवळ 80% लोकांमध्ये शास्त्रज्ञांना प्लास्टीकचे लहान कण सापडले आहेत. ज्यामुळे जगभरात सगळ्यांनाच धक्का बसला आहे. आपल्याला अनेकदा तज्ज्ञांकडून सल्ला देण्यात आला आहे की, प्लास्टिकच्या वस्तुंमधून अन्न खाऊ नये परंतु तरीही आपण याकडे लक्ष न देता प्लास्टिकच्याच डब्ब्यातून अन्न खातो. थंड पदार्थ ठिक आहे. परंतु गरम पदार्थ प्लास्टिकच्या वस्तुंमध्ये ठेवणे हे फार चुकीचे आहे. ज्याचा परिणाम आता समोर आला आहे.
प्लास्टीकचे हे लहान कण आपल्या अवयवांमध्ये देखील प्रवेश करू शकतात. त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो हे, अद्याप अज्ञात असले तरी, संशोधक चिंतेत आहेत कारण मायक्रोप्लास्टिक्समुळे प्रयोगशाळेतील मानवी पेशींचे नुकसान होऊ शकते.
शास्त्रज्ञांनी 22 अनामिक रक्तदात्यांच्या रक्त नमुन्यांचे विश्लेषण केले. हे सर्व लोक निरोगी प्रौढ होते. त्यांपैकी 17 मध्ये शास्त्रज्ञांना प्लास्टिकचे कण आढळले.
जवळपास अर्ध्या नमुन्यांमध्ये बाटल्या बनवण्यासाठी वापरले जाणारे पीईटी प्लास्टिक होते, तर एक तृतीयांश पॉलिस्टीरिन होते. जे अन्न आणि इतर उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी वापरले जाते
तसेच एक चतुर्थांश रक्त नमुन्यांमध्ये पॉलिथिलीन होते, ज्याचा वापर प्लास्टिकच्या वाहक पिशव्यांसोबत केला जातो.
प्रोफेसर डिक वेथाक, इकोटॉक्सिकोलॉजिस्ट, नेदरलँड्समधील व्रीज युनिव्हर्सिटी अॅमस्टरडॅम, म्हणाले, "आमच्या अभ्यासात हे पहिले संकेत आहे, ज्यामध्ये आम्हाला रक्तात पॉलिमर कण असल्याचे आढळले – हा एक यशस्वी रिझल्ट आहे. परंतु आम्हाला संशोधन वाढवावे लागेल आणि सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुन्यांची संख्या देखील वाढवावी लागेल."
"या गोष्टीची चिंता करण्याची आपल्याला नक्कीच गरज आहे. हे कण संपूर्ण शरीरात वाहून जातात." असे पुढे वेथाक यांनी 'द गार्डियनला' सांगितले.
एनव्हायर्नमेंट इंटरनॅशनल' जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.