Covid 19- फायझर आणि मॉडर्ना लसींचा भारतात येण्याचा मार्ग सोपा

 देशात लसींची आयात वाढवण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

Updated: Jun 2, 2021, 02:19 PM IST
Covid 19- फायझर आणि मॉडर्ना लसींचा भारतात येण्याचा मार्ग सोपा title=

मुंबई : देशात लसींची आयात वाढवण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे फायझर आणि मॉर्डना या विदेशी लसींचा भारतात येण्याचा मार्ग सोपा झाला आहे. ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाच्या म्हणण्याप्रमाणे, आपात्कालीन वापरासाठी इतर देश आणि जागतिक आरोग्य संस्थेकडून मंजुरी देण्यात आलेल्या लसींची चाचणी म्हणजेच ब्रिजींग ट्रायल करण्याची गरज भासणार नाहीये.

डीजीसीआयच्या (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) या निर्णयामुळे फायझर आणि मॉडर्ना या लसींचा भारतात येण्याचा मार्ग सोपा होण्यास मदत झाली आहे. लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी लसींच्या लोकल ट्रायलपासून सूट मिळण्यासाठी सरकारला विनंती केली होती. डीजीसीआयने सांगितलं की, या कंपन्यांसाठी लाँच नंतर ब्रिजींग ट्रायलपासून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. देशात लसीकरणाची गरज पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचंही डीजीसीआयचं म्हणणं आहे.

आपात्कालीन परिस्थितीत या लसींना मिळणार मंजूरी

भारतात आपात्कालीन वापरासाठी त्या लसींना मंजूरी देण्यात आली आहे ज्यांना US FDA, EMA, UK MHRA, PMDA जापान यांनी आपात्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. त्याचप्रमाणे WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन वापरासाठीच्या यादीत असलेल्या लसींचाही यामध्ये समावेश आहे.

दरम्यान भारतात स्पुतनिक लाईट कोरोना वॅक्सिन ही सिंगल डोसची लस लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. रूसची स्पुतनिक लाइट लस भारतात आणण्यासाठी डॉ. रेड्डीज भारत सरकारशी चर्चा करत आहेत. स्पुतनिक लाइट लस आल्यास ती पहिली सिंगल डोस असणारी लस बनेल.