Omicron आणणार कोरोनाचा नवा व्हेरिएंट; WHO चा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेने अजून एका धोकादायक व्हेरिएंटचा इशारा दिला आहे.

Updated: Jan 6, 2022, 02:47 PM IST
Omicron आणणार कोरोनाचा नवा व्हेरिएंट; WHO चा इशारा title=

मुंबई : सावध व्हा! संपूर्ण जगभरात ओमायक्रॉनने थैमान घातलं आहे. दरम्यान यामध्येच जागतिक आरोग्य संघटनेने अजून एका धोकादायक व्हेरिएंटचा इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे की, जगभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमुळे नवीन व्हेरिएंटचा धोका वाढू शकतो.

ओमायक्रॉन जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. ज्यावेळी हा व्हेरिएंट सापडला होता तेव्हा त्याच्या धोक्याविषयी अनेक अंदाज बांधले जात होते. मात्र आता याच्या संसर्गाचं प्रमाण फार सौम्य असल्याचं लक्षात आलंय. दरम्यान आता कोरोना लवकरच संपणार असून पहिल्याप्रमाणे जीवन जगणं शक्य होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

ओमायक्रॉनचं वाढता संसर्ग चिंतादायक

मात्र WHO ने सांगितलंय की इतक्या लवकर परिस्थिती पूर्ववत होईल असं वाटतं नाही. परंतु त्यापेक्षा अजून परिस्थिती बिकट होईल अशी भीती आहे. डब्ल्यूएचओच्या वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी कॅथरीन स्मॉलवूड यांनी सांगितलं की, ओमायक्रॉन संसर्गाच्या वाढत्या संक्रमणाचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

कॅथरीन यांच्या सांगण्यानुसार, "ओमायक्रॉन जितका जास्त पसरतो, जितक्या वेळा व्हायरस त्याचं स्वरूप बदलतो. त्यामुळे तितकाच नवा व्हेरिएंट समोर येण्याची शक्यता असते. ओमायक्रॉन डेल्टा प्रकारापेक्षा कमी प्राणघातक असू शकतो. पण नवीन व्हेरिएंट किती धोकादायक हे काही सांगता येत नाही."

डब्ल्यूएचओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, महामारी सुरू झाल्यापासून युरोपमध्ये 100 दशलक्षाहून अधिक कोरोनाची प्रकरणं नोंदवली गेली. 2021 च्या शेवटच्या आठवड्यात 5 दशलक्षाहून अधिक नवीन प्रकरणं नोंदवली गेली. कॅथरीन की, ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.