Immunity वाढवणारा काढा, सी व्हिटॅमिनचा ओव्हरडोस होऊ देऊ नका, नाहीतर...

औषधं किंवा काढ्याचं योग्य प्रमाण नसल्याने, अनेकांना याबाबतची योग्य माहिती नसल्याने नवीन समस्या समोर येत आहेत.

Updated: Jul 28, 2020, 06:05 PM IST
Immunity वाढवणारा काढा, सी व्हिटॅमिनचा ओव्हरडोस होऊ देऊ नका, नाहीतर... title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अनेक जण काढा, सी-व्हिटॅमिन आणि इतरही अनेक गोष्टींचं सेवन करतात. परंतु काढा, सी-व्हिटॅमिनचं अति सेवन, ओव्हरडोस झाल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. 

कोरोना व्हायरसला मात देण्यासाठी सर्वात मोठं हत्यार म्हणजे रोगप्रतिकारशक्ती अर्थात इम्युनिटी. इम्युनिटी वाढवण्यासाठी लोक अनेक प्रकारांचा अवलंब करत आहेत. अनेक जण काढा करुन सतत घेत आहेत. अश्वगंधा, काळी मिरी, तुळस, लवंग, लसून, हळद यांसारख्या आणखी काही मसाल्यांचा वापर करुन काढा तयार करण्यात येतो. हा काढा किंवा व्हिटॅमिन सीच्या गोळ्या अनेकांकडून वारंवार खाल्या जातात. परंतु औषधं किंवा काढ्याचं योग्य प्रमाण नसल्याने, अनेकांना याबाबतची योग्य माहिती नसल्याने नवीन समस्या समोर येत आहेत.

मेडिसिन विभागाचे सिनियर डॉ. आशिष जैसवाल यांनी सांगितलं की, दालचिनी, गिलोय, काळी मिरी यांसारख्या मसाल्यांचा ओव्हरडोस अल्सर, पोटदुखी, छातीत जळजळ, ऍसिडिटी अशा समस्याचं कारण ठरत आहे. याचा ओव्हरडोस लिव्हरसाठी नुकसानदायक ठरु शकतो. 

मसाल्यांच्या ओव्हरडोसमुळे गरोदर महिलांना त्रास होऊ शकतो. गर्भपाताचाही धोका होऊ शकतो. व्हिटॅमिन सीच्या ओव्हरडोसमुळे क्रॅम्प्स, उलटीसारख्या समस्या होऊ शकतात.

- दररोज अडीच ग्रॅम हळद खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे. परंतु त्याहून अधिक सेवन  नुकसानदायक ठरु शकतं.
- दररोज 8 ग्रॅम किंवा त्याहून अधिक हळद खाल्यास जुलाब, डायरिया, अल्सर, बद्धकोष्ठता यासारखा त्रास होऊ शकतो.
- दररोज एक ग्रॅम व्हिटॅमिन सी निरोगी ठेवते. परंतु याचं त्याहून अधिक सेवन किडनीला त्रासदायक ठरु शकतं. त्याशिवाय स्टोन होण्याची शक्यताही असू शकते.