मुंबई : मुंबईत शुक्रवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या दोन हजारांच्या पुढे दिसून आली. राज्यात आढळलेल्या रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत आढळलेत. शुक्रवारी 2,255 नवीन कोरोना रुग्ण आढळले आणि 2 रुग्णांचा मृत्यू झाला. तर गेल्या 24 तासांत केवळ 14,643 लोकांची तपासणी करण्यात आली आहे.
शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांपैकी 2,143 रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. यामध्ये 110 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या रुग्णालयात 569 रुग्ण दाखल आहेत. यामध्ये 76 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं आहे.
दुसरीकडे राज्यात कोरोनाचा कहर सातत्याने कायम दिसून येतोय. राज्यात गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी 90 रुग्ण कमी सापडलेत. मात्र, असं असलं तरी आरोग्य विभागाची चिंता कायम आहे. राज्यात आज एकूण 4 हजार 165 जणांना कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. तर गुरुवारी 4 हजार 255 जण पॉझिटिव्ह सापडले होते.
कोरोनामुळे राज्यात दिवसभरात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सक्रीय रुग्णांचा आकडा हा 21 हजारांच्या वर गेला आहे. राज्यात ताज्या आकडेवारीनुसार 21 हजार 749 एक्टीव्ह रुग्ण आहेत. या रुग्णांवर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे.