close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वाढत्या घामोळ्यांवर करा घरगुती उपाय

उन्हाळ्यात गरम होत असल्याने मोठ्या प्रमाणात घाम येतो आणि त्यामुळेच घामोळ्यांची समस्या निर्माण होते. जाणून सोपे घरगुती उपाय...

Updated: Apr 21, 2019, 12:10 PM IST
 वाढत्या घामोळ्यांवर करा घरगुती उपाय

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रभरात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. तापमानाचा पारा ४० च्या पुढे पोहचला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेत. उन्हाळा आला की घामोळ्यांचाही त्रास सुरु होतो. उन्हाळ्यात गरम होत असल्याने मोठ्या प्रमाणात घाम येतो आणि त्यामुळेच घामोळ्यांची मोठी समस्या निर्माण होते. घामोळ्यांमुळे त्वचेवर रॅशेस, त्वचा लाल होणे, खाज येणे त्रासदायक ठरते. घामोळ्या अधिकतर पाठ, पाय, हात आणि गळ्यावर येतात. यासाठी बाजारात अनेक पर्याय, उत्पादने उपलब्ध आहेत परंतु हे पर्याय तात्पुरते असतात. या पर्यायांनी घामोळ्या जाण्याऐवजी रिअॅक्शन होण्याचाही धोका अधिक असतो. परंतु काही सोप्या, घरगुती उपचारांनी घामोळ्यांची समस्या कमी करण्यास मदत होते. 

कच्चा बटाटा - 

कच्च्या बटाट्याच्या रसात गुलाब पाणी मिसळून घामोळ्या आलेल्या ठिकाणी लावावे. हे मिश्रण २० मिनिटे तसेच लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून ३ वेळा हा उपाय करा.

चंदन पावडर - 

चंदन पावडर आणि गुलाब जल एकत्र करून ही पेस्ट २० ते २५ मिनिटे घामोळ्यांवर लावून ठेवल्यानेही फायदा होतो. 

बेकिंग सोडा - 

बेकिंग सोड्यात पाणी मिसळून त्याची पेस्ट तयार करुन घामोळ्या आलेल्या जागेवर १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने धुवा. हा उपाय आठवड्यातून चार वेळा केल्याने चांगले परिणाम मिळतात.

मुलतानी माती - 

मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र करुन प्रभावित जागेवर लावा सुकल्यानंतर धुवून टाका. हे मिश्रण आठवड्यातून चार वेळा लावा. पुदिना, मुलतानी माती आणि थंड दूध याची पेस्ट करुनही ती लावल्याने घामोळ्यांचा त्रास कमी होतो.

कडूलिंब -

कडूलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावल्याने घामोळयांची समस्या दूर होते. तसेच सकाळी अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पानं उकळवून त्याने अंघोळ केल्यानेही फायदा होतो. कडूलिंबाच्या पानांनी त्वचेचे इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.