Stone Powder Found in Flour Brand Factory: उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये स्थानिक पीठ गिरणीमध्ये एक फारच विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. या छापेमारीमध्ये अधिकाऱ्यांना पीठ गिरणीमध्ये चक्क 400 किलो दगडाची पावडर आढळून आली आहे. या दगडाच्या पावडरला अलबस्तर असं म्हणतात. 'पंचवटी आटा' नावाच्या प्रसिद्ध पिठामध्ये ही दगडी पावडर मिक्स केली जात होती. सहाय्यक आयुक्त अजय जयसवाल यांनी स्थानिक जिल्हा अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही छापेमारी केली होती असं सांगितलं. अलिगढमधील औद्योगिक वसाहतीमध्ये हा कारखाना आहे. आमच्या तपासादरम्यान पिठामध्ये दगडाची पावडर टाकली जात होती असं समोर आलं आहे.
25 जुलै रोजी ही छापेमारी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी या कारखान्यातील कर्मचाऱ्यांना पिठात दगडी पावडरची भेसळ करताना रंगेहाथ पकडलं आहे. भेसळ केलेलं हे पीठ पॅक करुन 'पंचवटी आटा' नावाने विकलं जायचं. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने तातडीने या पिठाचा बाजारातील सर्व साठा काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेली 'पंचवटी आटा' पाकिटं परत मागवण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अजय जयसवाल यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांना सापडलेली पावडर ही पांढऱ्या रंगाची होती. म्हणजेच ही दगडाची पावडर पिठामध्ये टाकल्यास ती सहज कळून येत नाही. विशेष म्हणजे ही पावडर पिठापेक्षाही बारीक होती. म्हणूनच पीठ आणि ही पावडर एकत्र केल्यास दोन्ही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या काढणं जवळपास अशक्यच आहे.
अशाप्रकारची भेसळ केवळ याच कारखान्यात होत होती की हे जाळे फार दूरवर परसलेले आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत. लोकांचा जीव धोक्यात टाकून नफा कमवण्यासाठी पिठासारख्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये सहज कळून न येणाऱ्या गोष्टीची भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासांदर्भातील हलचाली अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाने सुरु केल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अशाप्रकारे विकल्या जाणाऱ्या ब्रॅण्डेड पिठाच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.
अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभाग वेळोवेळी अशा कारखान्यांवर छापेमारी करुन तेथील प्रोडक्ट्सची गुणवत्ता तपासून पाहत असतं. अनेकदा दूध, कोल्ड ड्रींक्सबरोबरच अन्य पदार्थांमध्ये भेसळ करुन विकल्याचं समोर आलं आहे. मात्र अशाप्रकारे पिठामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचा प्रकार पहिल्यांदच समोर आला आहे.