कोरोनाला हलक्यात घेऊ नका; 'या' जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रूग्णांची नोंद

आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा जिल्हानिहाय संसर्गाचा अहवाल तयार केला आहे.

Updated: Nov 25, 2021, 10:18 AM IST
कोरोनाला हलक्यात घेऊ नका; 'या' जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रूग्णांची नोंद

मुंबई : देशातील 10 राज्यांतील 32 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अजूनही पाच टक्क्यांहून अधिक दिसून येत आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश ते ईशान्य आणि दक्षिणेकडील राज्यांचा समावेश आहे. सध्या देशात मिझोराममधील सेरछिप जिल्ह्यात सर्वाधिक नमुने संक्रमित होत असल्याचं लक्षात आलं आहे. गेल्या एका आठवड्यात याठिकाणी 26 टक्क्यांहून अधिक संसर्गाची नोंद झाली आहे. तर अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात दररोज 17 ते 18 टक्के नमुने संक्रमित होतायत.

दररोज 18% नमुने संक्रमित होतायत

आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा जिल्हानिहाय संसर्गाचा अहवाल तयार केला आहे. या अंतर्गत अरुणाचल, आसाम, हिमाचल, केरळ, लडाख, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि बंगाल या जिल्ह्यांमध्ये 5% किंवा त्याहून अधिक संसर्ग दर नोंदवला जातोय.

ही स्थिती 16 ते 22 नोव्हेंबरपर्यंत दिसून आली. अरुणाचल, केरळ आणि मिझोराम या तीन राज्यांतील 14 जिल्ह्यांमध्ये दररोज 10 ते 18 टक्के नमुने संक्रमित होत असल्याची नोंद आहे.

देशात कोरोनाची तपासणी वाढल्यानंतर नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या एका दिवसात दोन लाखांहून अधिक नमुन्यांच्या तपासणीत वाढ झाली असून, त्यामुळे कोरोनाचे नवीन रुग्णांचं प्रमाण 7,559 वरून 9,283 वर पोहोचलं आहे.

कोव्हॅक्सिन 50 टक्के प्रभावी

एम्सच्या एका अभ्यासात स्वदेशी लस कोव्हॅक्सिन 50 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. लसीचे दोन्ही डोस 28 दिवसांच्या अंतराने घेतल्यावर त्याचा परिणाम 50 टक्क्यांपर्यंत दिसून आला आहे. त्याच वेळी, 42 दिवसांनंतर हा प्रभाव 57 टक्क्यांपर्यंत नोंदवला गेला आहे.