JN.1 Variant: कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरिएंटला WHO ने केलं वर्गिकृत; पाहा किती आहे धोकादायक

WHO On JN.1 Variant: JN.1 ला पहिल्यांदा BA.2.86 च्या मूळ वंशाचा भाग म्हणून 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' असं क्लासिफाय करण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेने सदस्य देशांना व्हायरस बदलत आणि विकसित होत असल्याची माहिती दिलीये. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 20, 2023, 08:34 AM IST
JN.1 Variant: कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरिएंटला WHO ने केलं वर्गिकृत; पाहा किती आहे धोकादायक title=

WHO On JN.1 Variant: नुकतंच कोरोनाचा नवा JN.1 हा सब व्हेरिएंट समोर आला आहे. केरळमध्ये देखील या सब-व्हेरिएंटचा एक रूग्ण आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या या नव्या सब-व्हेरिएंट JN.1 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' च्या रूपात क्लासिफाय केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा हा सब व्हेरिएंट सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक नाहीये. 

JN.1 ला पहिल्यांदा BA.2.86 च्या मूळ वंशाचा भाग म्हणून 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' असं क्लासिफाय करण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेने सदस्य देशांना व्हायरस बदलत आणि विकसित होत असल्याची माहिती दिलीये. 

WHO च्या म्हणण्यानुसार, सध्याच्या पुराव्याच्या आधारावर JN.1 द्वारे उद्भवणारा धोका सध्या कमी मानला जातो. सध्या कोरोनावर उपलब्ध असलेल्या लसी JN.1 आणि कोविड-19 व्हायरसच्या इतर सर्क्युलेटींग व्हेरिएंटपासून संरक्षण करतील. याशिवाय यामुळे होणाऱ्या गंभीर आजार आणि मृत्यूपासून संरक्षण करते.

'WHO च्या सल्ल्याचं पालन करा'

डब्ल्यूएचओने यासंदर्भात एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, डॉ. मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी श्वसन रोग COVID-19 आणि JN.1 सब व्हेरिएंटच्या सध्याच्या वाढीबद्दल माहिती दिली आहे. डब्ल्यूएचओची या परिस्थितीवर नजर आहे. या सिझनमध्ये तुमचं कुटुंब आणि मित्रांना सुरक्षित ठेवण्यासाठी WHO च्या सार्वजनिक आरोग्य सल्ल्याचं पालन करावं.

भारतात सापडलाय JN.1 चा रूग्ण

8 डिसेंबर रोजी भारतातही JN.1 प्रकाराचे पहिलं प्रकरण नोंदवलं गेलंय. केरळमधील 79 वर्षीय महिलेला याची लागण झाली होती. ही गोष्ट समोर आल्यानंतर केरळसह शेजारील राज्यांना सतर्क करण्यात आलं होतं. सोमवारी केंद्र सरकारने राज्यांना कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून सतर्क राहण्याबाबत सल्ला दिला होता. केंद्राकडून राज्यांना RT-PCR सह पुरेशा चाचण्या सुनिश्चित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 

JN.1 सब व्हेरिएंटची लक्षण

कोरोनाच्या गेल्या काही व्हेरिएंटसारखीच या व्हायरसचीही लक्षणं दिसून येत असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये ताप येणं, नाक वाहणं, डोकेदुखी, घशात खवखवणं, पोटदुखी यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. जेएन 1 या सब व्हेरिएंटची लागण झाल्यास पचनासंदर्भातील समस्या अधिक वाढतात.