Ovarian cancer: ओव्हेरियन कॅन्सर हा देशातील सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. या कर्करोगाचे वेळीच निदान व उपचार न झाल्यास तो जीवघेणा ठरतो. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी सीए-125 रक्त आणि ट्रान्सव्हॅजायनल अल्ट्रासाऊंड (TVUS) सोबत रोमा (ROMA)चा निदापर्याय तसेच ओटीपोटात दुखणे, असह्य वेदना आणि सूज येणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ओव्हेरियन कॅन्सरची (अंडाशयाचा कर्करोग) सुरुवात बीजांडातून होते आणि हा एक सर्वात प्राणघातक कर्करोग आहे ज्यामुळे देशातील सर्वाधिक मृत्यूचे कारण ठरत आहे.
मुंबईतील पॅथॉलॉजिस्ट डॉ राजेश बेंद्रे यांच्या सांगण्यानुसार, ओव्हेरियन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं ही इतर सर्वसामान्य लक्षणांसारखीच असतात. पोट फुगल्यासारखं वाटणं, धाप लागणं, वारंवार लघवीला जावं लागणं, ॲसिडिटीचा त्रास, मासिक पाळीत अनियमितता इत्यादी अस्पष्ट लक्षणांमुळे प्राथमिक टप्प्यात दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक असते. हे वयोवृध्द महिला तसेच 30 वर्षावरील तरुण स्त्रियांमध्ये दिसून येते. यामध्ये जोखमीचे घटक म्हणजे गर्भधारणा, अकाली मासिक पाळी, उशीरा रजोनिवृत्ती, तंबाखू, धूम्रपान, उशीरा गर्भधारणा, लठ्ठपणा आणि कौटुंबिक इतिहास. या कर्करोगाचे वेळीच निदान आणि उपचारांमुळे रुग्णांचे जगण्याचे प्रमाण वाढते.
गर्भाशयाच्या कर्करोगाचा शोध घेण्यासाठी सर्वात महत्वाची चाचणी म्हणजे CA-125 रक्त चाचणी जी गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या स्त्रियांमध्ये उच्च प्रथिनांची पातळी मोजण्यास मदत करते. तुमचे डॉक्टरच तुम्हाला या चाचणीचा पर्याय निवडण्याचा सल्ला देईल. गर्भाशयाच्या कर्करोगाच्या जोखमीचे निदान करण्यासाठी ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड ही आणखी एक चाचणी आहे.
सीटी स्कॅन सारख्या इतर चाचण्या बीजांडातील असामान्यता ओळखण्यात मदत करू शकतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका ओळखता येऊ शकतो. शिवाय बायोप्सीसारख्या निदान पद्धती वेळीच निदान आणि एखाद्याचा जीव वाचवण्यास फायदेशीर ठरत आहे. 25 वर्षांनंतरच्या स्त्रियांनी नियमितपणे गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करुन घेणे आणि योग्य वेळी निदान आणि उपचार करणे आवश्यक आहे. या कर्करोगाचे वेळीच निदान करण्यासाठी नियमित तपासणी आणि डॉक्टरांकडे फॅालोअप करणे गरजेचे आहे.
डॉ. बेंद्रे म्हणाले की, डॉक्टर ट्यूमरची लक्षणे, टप्पा आणि स्थान यानुसार उपचार ठरवतात. एखाद्याला केमोथेरपी, रेडिएशन थेरपी किंवा टार्गेटेड थेरपीसह शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जाईल. डॉक्टरांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आणि जीवनाचा दर्जा सुधारणे अत्यावश्यक आहे. या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी निरोगी आहाराचे सेवन करा, दररोज व्यायाम करा आणि धूम्रपान आणि मद्यपानाचे सेवन टाळा.