मुंबई : केसगळती ही नैसर्गिक प्रकिया आहे. परंतू दिवसाला 60 -100 पेक्षा अधिक केस गळत असतील तर मात्र ही धोक्याची घंटा आहे. सुरूवातीच्या टप्प्यामध्ये केसगळतीचा त्रास दिसला की शाम्पू, तेल बदलले जातात पण मूळ कारण काही वेगळंच असू शकतं. शारिरीक, मानसिक कारणांसोबतच केसांचे आरोग्य सांभाळताना आपल्याकडून होणार्या या काही चुकादेखील केसगळतीचे कारण ठरतात. त्यामुळे स्वतःच काही निष्कर्ष काढण्याआधी या गोष्टीही तपासून पहा.
शारिरीक व मानसिक ताण हे केसगळतीचे एक प्रमुख कारण आहे. तणावामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते पण त्याचबरोबर केसगळतीही वाढते. त्यामुळे वेळच्यावेळी तणाव दूर करा.
गरम पाण्याने केस धुणे टाळा. यामुळे केसांचे नुकसान होऊन केसगळती वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे केस धुताना कोमट पाणी वापरा.
केस ओले असताना विंचरल्यास ते तुटण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ओले केस शक्यतो वाळल्याशिवाय विंचरू नये.तसेच ते विंचरताना मोठ्या दातांचा ब्रश वापरावा.
दररोज घट्ट पोनीटेल किंवा आंबाडा घालणे हे चुकीचे आहे. यामुळे केसांचे नुकसान होते. त्यामुळे केस बांधताना सैलसर बांधावे. तसेच ते एकाच जागी न बांधता वर-खाली बांधावेत.
गरम पाण्याने केस धुण्याइतकेच ब्लो ड्रायर वापरणेदेखील वाईट आहे. हेअरस्टाईल करण्यासाठी नेहमी ब्लो ड्रायर वापरणे चुकीचे आहे. आवश्यकता भासल्यास 'कोल्ड'सेटिंग करून वापरावा.
सतत शाम्पू किंवा कंडीशनर बदल्याने तुमच्या केसांचे नुकसान होते.तसेच केसगळती वाढू शकते.म्हणूनच योग्य सल्ल्याने शाम्पूची निवड करा. तसेच एखादा नवा शाम्पू वापरल्यानंतर केसगळती वाढल्याचे लक्षात आल्यास वेळीच तो शाम्पू वापरणे टाळा.
काही औषधांचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. 'केसगळती' हा त्यापैकीच एक परिणाम आहे. त्यामुळे अधिक प्रभावी औषध खाल्ल्यावर त्याच्या परिणामांवरही लक्ष ठेवा. केसगळतीचे प्रमाणखूप असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.