गर्भारपणातील लसीकरणाचे 'हे' आहेत फायदे

 गर्भातील बाळांना विविध आजारांचा संसर्ग होण्याचा धोका

Updated: Aug 21, 2020, 02:57 PM IST
गर्भारपणातील लसीकरणाचे 'हे' आहेत फायदे title=

मुंबई : कुठल्याही संसर्गजन्य आजाराशी लढण्यासाठी चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे आवश्यक आहे. मात्र असे अनेक संसर्गजन्य आजार आहेत ज्यांच्याशी लढण्याची पुरेशी शक्ती आपल्या शरीरात नसते. अशावेळी विशिष्ट लसी या आजारांशी लढण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतात. गर्भवती मातांना आणि गर्भातील बाळांना विविध आजारांचा संसर्ग होण्याचा धोका असतो. अशावेळी लसीकरण फायदेशीर ठरतं असल्याचे मदरहुड हॉस्पीटलच्या प्रसूति व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनु विज यांनी सांगितले.

गर्भारपणात स्त्रीच्या संप्रेरकामध्ये बदल होत असतात. याकरिता पौष्टीक आहार, नियमित व्यायाम जितका मह्त्वाचा असतो तितकेच लसीकरणे देखील महत्त्वाचे असते.  गोवर हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून तो रूबेला विषाणूमुळे होतो. यामुळे अकाली प्रसूतीची शक्यता वाढते. इतकंच नाहीतर एखाद्या महिलेला गर्भावस्थेदरम्यान हेपेटायटीसचा संसर्ग झाला असल्यास जन्माच्या दरम्यान ते बाळालाही होऊ शकते. त्यामुळे गर्भवती महिलांनी लसीकरण करून घेणं गरजेचं असतं. यात टिटॅनस टॉक्साईड, हेपेटायटीस 'बी', रेबीज व्हॅकिन, डिप्थीरिया आणि इन्फ्लुएंझा लसींचा समावेश आहे.

गरोदर महिलांना कोणत्या लसी द्याव्यात टिटॅनस टॉक्साईडः- ही गर्भवती महिलांना २४ आठवड्यांनंतर नियमित देण्याची लस आहे. चार आठवड्यातून दोनदा ही लस महिलेला द्यावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून ही लस महिलांना दिली जातेय. यामुळे गर्भातील बाळाला कुठल्याही प्रकारचा संसर्ग होत नाही.

हेपेटायटीस लस  : - गर्भवती महिलेला हेपेटायटीसचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या बाळालाही हा आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी हेपेटायटीस लस टोचली जाते.

हेपटायटीस बी लसः- गर्भधारणेच्या काळात कुठल्याही इन्फ्लुएंन्झा लस महिलेला दिल्यास विविध संसर्गापासून तिचं संरक्षण होतं. त्यामुळे हेपटायटीस बी या लसीचे तीन डोस मातांना द्यावेत लागतात. यात ०,१,६ व्या महिन्यात ही लस घ्यावी लागते. त्यामुळे स्वाईन फ्लू, मलेरिया, न्यूमोनिया यांसारख्या आजारांपासून गर्भवती आणि बाळाचे संरक्षण होतं. ही लस जून आणि ऑक्टोबर दरम्यान दिली जाते.

टीडॅप  लसः- ही लस नवीन असून या लसीसंदर्भात अद्याप जागरूकता नाहीये. यासाठी देण्यात येते टीडॅप लस-

गर्भावस्थेदरम्यान धर्नुवात (टिटॅनस) हा आजार झाल्यास महिलेचा जीव धोक्यात येतो.

डायफ्थेरिया (Diphtheria) हा श्वसनाचा संसर्ग असून तो श्वसनाच्या समस्या, पॅरेलिसीस आणि कोमा यांना कारण ठरतो.

पर्टुसिस(Pertussis) हा एक संसर्गजन्य जीवाणूंचा आजार असून तो नवजात बालकांमध्ये मृत्यूचं कारण ठरू शकतो. त्यामुळे धनुर्वात, डायफ्थेरिया, पर्टुसिस इंजेक्शन टीडॅप) महिलांना गरोदरपणात २७-३६ व्या आठवड्यात घ्यावं लागतं.

टायफॉईड- स्त्रियांना प्रसूतीनंतर टायफॉईड किंवा चिकन पॉक्स होऊ नये म्हणून लस दिली जाते. ही लस घेतल्यानंतर गर्भवती स्त्रियांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसंच बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत जेणेकरून बाळाला संसर्ग होणार नाही.

गर्भवतींना या लसी देऊ नये

गर्भवतींना एचपीव्ही, गोवर,रुबेला, गालगुंड, कांजण्या या लसी देत नाहीत. या आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी गर्भवती महिलांनी गर्भरधारणा करण्यापुर्वी किमान दिड महिना आधी या लसी घ्याव्यात. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच लसींची आखणी करा. हे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला रोगमुक्त आयुष्य जगू देईल