Weight Gain: मासिक पाळीच्या काळात वजन वाढतंय...लगेच या सवयींना आवर घाला

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अचानक वजनात वाढ होत असल्याचं जाणवतं. 

Updated: Jun 13, 2021, 03:35 PM IST
Weight Gain: मासिक पाळीच्या काळात वजन वाढतंय...लगेच या सवयींना आवर घाला title=

मुंबई : वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएट आणि व्यायाम नक्कीच करत असाल. मात्र मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अचानक वजनात वाढ होत असल्याचं जाणवतं. तुमचंही वजन वाढत असेल तर घाबरून जाऊ नका. कारण मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वजन वाढणं ही एक सामान्य गोष्ट आहे. 

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये वजनात वाढं होणं म्हणजे तुमच्या शरीरात फॅट्स अधिक झाले आहेत असं नाही. या दिवसांमध्ये वजनात वाढ होते कारण शरीरात वॉटर रिटेंशन होतं ज्यामुळे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन या हार्मोनची मात्रा बदलते. त्याचप्रमाणे मीठाच्या पदार्थांचं अतिसेवन केल्याने देखील वजन वाढ होते. अशा दिवसात वजन वाढीला प्रतिबंध कसा करावा यासाठी काही उपाय आहेत.

पाणी न पिणं

जेव्हा तुम्ही दिवसात भरपूर पाणी न पिता तेव्हा शरीरात द्रव जमा होण्यास सुरवात होते. यासह, जर आपण जास्त खारयुक्त पदार्थ खाल्ले तर ते आपल्या सिस्टममधून बाहेर पडण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे दिवसाला कमीतकमी 3-4 लीटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही नारळपाण्याचाही समावेश करू शकता.

खाण्याची इच्छा (क्रेविंग) टाळा

तुम्ही कधी अधिक लक्ष दिलं नसेल पण मासिक पाळीच्या वेळी महिलांच्या वजनामध्ये 1 किंवा 2 किलोंनी वाढ होते. हे हार्मोनच्या पातळीत वाढ होण्यामुळे आणि मासिक पाळीच्या आधी अयोग्य खाण्यापिण्याच्या इच्छेमुळे होतं. हेल्दी खाण्याचं प्रमाण वाढवून वजन वाढीच्या तक्रारीवर मात केली जाऊ शकते.

कॅफेनचं अधिक सेवन करू नये

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अनेक महिला चहा तसंच कॉफीचं खूप सेवन करतात. यामुळे वॉटर रिटेंशन आणि पोटफुगी होऊ शकते परिणामी वजन वाढतं. त्यामुळे या दिवसात वजनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रीन टी किंवा गरम पाणी प्यावं. 

वर्कआऊट करा

मासिक पाळीदरम्यान महिलांनी वर्कआऊट करू नये असं मानलं जातं. यामुळे त्रास जास्त होण्याची शक्यता असते. मात्र मासिक पाळी दरम्यान सौम्य व्यायाम करण्यास काही वाईट नाही. वर्कआऊट केल्याने वेदनेपासून मुक्तता मिळेल शिवाय वजन कमी होण्यासही मदत होईल.