Health emergency म्हणून घोषित होणार मंकीपॉक्स? WHO घेणार मोठा निर्णय!

कोरोनानंतर मंकीपॉक्सने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे.

Updated: Jun 15, 2022, 08:06 AM IST
Health emergency म्हणून घोषित होणार मंकीपॉक्स? WHO घेणार मोठा निर्णय! title=

मुंबई : कोरोनानंतर मंकीपॉक्सने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंगळवारी 23 जून रोजी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. यामध्ये मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव पाहता त्याा सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणजेच 'हेल्थ इमरजेंसी' म्हणून जाहीर करायचं की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख, टेड्रोस अॅधानोम घेब्रेयसस यांनी सांगितलं, "मंकीपॉक्सचा उद्रेक असामान्य आणि चिंताजनक आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार पुढील आठवड्यात आपत्कालीन समिती बोलावण्याचा निर्णय घेतलाय. या बैठकीत मंकपॉक्सला 'हेल्थ इमरजेंसी' जाहीर करण्याबाबत निर्णय घेणार आहोत."

भारतासह जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता पुन्हा एक नवीन टेन्शन वाढलं आहे. मंकीपॉक्सने जगाचं आणि तज्ज्ञांचं टेन्शन वाढवलं आहे. मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे आता जागतिक आरोग्य संघटना आणि तज्ज्ञांनी अलर्ट जारी केला आहे. 

ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्सचे 470 रुग्ण आढळले आहेत. 104 नव्याने रुग्ण सापडल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये बायसेक्शुअल पुरुषांना अधिक धोका असल्याचं आढळून आलं. 

जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार 28 देशांमध्ये मंकीपॉक्सचे 1,285 रुग्ण समोर आले आहेत. अजूनतरी आफ्रिका सोडून इतर देशांमध्ये मंकीपॉक्समुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. त्यामुळे ती एक दिलासादायक बाब म्हणायला हरकत नाही. मात्र तरीही मंकीपॉक्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.