कांदा कापताना डोळ्यात पाणी का येतं?

4 उपायांचा वापर करा 

Updated: Dec 8, 2019, 02:29 PM IST
कांदा कापताना डोळ्यात पाणी का येतं?

मुंबई : सध्या कांदा हा सगळ्यांच्याच डोळ्यातून पाणी काढत आहे. कांद्याचे दर आभाळाला भिडले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणारे दर आता 100 रुपये किलोच्या आसपास पोहोचले आहेत. यामुळे ग्राहक कंटाळला आहे. पण असा देखील कांदा आपल्या डोळ्यातून पाणी काढतोच. 

कधीही कुणीही कांदा कापला तर त्याच्या डोळ्यातून पाणी का येत? या मागचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत. कांदा हा अनेक पापुद्रांनी बनलेला असतो. यामध्ये प्रॉपेंथियल-एस-ऑक्साइड नावाचं रसायन असतं. हे रसायन कांदा कापताना आपल्या डोळ्यातील लेक्राइमल ग्लँडला उत्तेजित करतात. ज्यामुळे आपल्या डोळ्यातून कांदा कापताना पाणी येतं. 

कांद्यामध्ये काही गंधसंयुक्ते संयुग आणि एन्झाइम असतात. हे सुरूवातीला म्हणजे जेव्हा कांदा कापत नाही तेव्हा एकमेकांपासून दूर असतात. एकदा कांदा कापला की, त्याचे रूपांतर ऍसिडमध्ये आणि ऍसिडचे रुपांतर गंधकयुक्त ऑक्साईडमध्ये होतं. 

बाष्पनशील असलेल्या या रसायनाचे रुपांतर वायूत होतं. हा वायू थेट डोळ्यात जातो. या वायूतील सलफ्युरिक ऍसिड डोळे चुरचुरण्यास कारणीभूत असतात. यामुळे डोळ्यातून पाणी येते. पण यामुळे डोळ्यांना कोणताही त्रास होत नाही उलट यामुळे अधिक डोळे मोकळे होतात. 

अनेकांना कांदा कापताना अतिशय त्रास होतो. अशावेळी काय उपाय करावा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. अशावेळी खालील उपाय करा

1. कांदा कापण्यापूर्वी 20 ते 25 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा 

2. कांद्याचे दोन भाग केल्यानंतर पाण्याने भरलेल्या भांड्यात बुडवून ठेवा 

3. कांदा कापल्यावर वाहत्या पाण्याखाली म्हणजे नळाखाली धरा 

4. कांदा कापताना सर्वात प्रथम खालचा पांढरा भाग काढून टाका