मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी प्रतिबंधक लस मोठं हत्यार मानलं जातंय. देशात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून सध्या 2 लसींचे डोस दिले जात आहेत. दरम्यान ओमायक्रॉनचा धोका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बूस्टर डोसचीही घोषणा केली. मात्र इंदोरमध्ये 4 डोस घेतलेल्या महिलेला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये देवी अहिल्याबाई होळकर इंटरनॅशनल एअरपोर्टवर या महिलेला संसर्ग झाल्याचं समजलं. या महिलेची रॅपिड कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. ही 44 वर्षांची महिला एअर इंडियातून इंदोर ते दुबई जाणार होती. मात्र तिला प्रवास करण्यास मनाई करण्यात आली. त्यानंतर दुबईत राहणाऱ्या महिलेला स्थानिक रूग्णालयात भर्ती करण्यात आलं.
मुख्य गोष्ट म्हणजे ही महिला पूर्णपणे वॅक्सिनेटेड आहेत. इतकंच नाही तर या महिलेने 2 वेगवेगळ्या लसींचे एकूण 4 डोस घेतले आहेत.
दरम्यान आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका कौरव यांनी सांगितलं की, या महिलेने जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान चीनी फार्मा कंपनी सिनोफार्म आणि अमेरिकन कंपनी फायझर यांच्याकडून कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतले होते.
डॉ. प्रियंका कौरव पुढे म्हणाल्या, स्थानिक विमानतळावर रॅपिड आरटी-पीसीआर चाचणीत संसर्ग झालेल्या महिलेला सध्या लक्षणं दिसत नाहीत, मात्र तिने विमानतळावरील आरोग्य विभागाच्या टीमला सांगितलं की, तिला चार दिवसांपूर्वी सर्दी-खोकल्याचा त्रास झाला होता.
संक्रमित महिलेला इंदूरच्या शासकीय मनोरमा राजे टीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.