सैन्याधिकाऱ्यांमधील चर्चेनंतर चीनच्या ताब्यातील १० भारतीय जवान परतले

१५ आणि १६ जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. 

Updated: Jun 19, 2020, 04:49 PM IST
सैन्याधिकाऱ्यांमधील चर्चेनंतर चीनच्या ताब्यातील १० भारतीय जवान परतले title=

नवी दिल्ली: गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. या झटापटीदरम्यान भारताच्या १० सैनिकांना चीनने बंदी बनवले होते. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या चर्चेनंतर या सैनिकांना गुरुवारी सोडून देण्यात आले. चीनने सोडलेल्या १० सैनिकांमध्ये चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व सैनिक काल दुपारी चारच्या सुमारास भारतीय हद्दीत परतल्याचे समजते. 

१५ आणि १६ जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर दोन्ही देशांनी गलवान खोऱ्यातून आपले सैन्य माघारी घेतले होते. तेव्हापासून भारत आणि चीन यांच्यात राजनैतिक आणि लष्करी पातळीवर सातत्याने चर्चा सुरु आहे. 

भारताला शांतता हवी आहे. मात्र, कोणीही भारताला डिवचल्यास जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल. गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या २० भारतीय जवानांनी शत्रूला मारता मारता हौतात्म्य पत्कारले, याचा आम्हाला गर्व असल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले होते. 

यापूर्वी भारताकडून आपले काही जवान बेपत्ता असल्याचे वृत्त नाकारण्यात आले होते. तर चीननेही शुक्रवारी आपल्या ताब्यात एकही भारतीय सैनिक नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सध्या दोन्ही देशांकडून गलवान खोऱ्यातील तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. मात्र, गलवान खोऱ्यातील घटनेला भारतच पूर्णपणे जबाबदार असल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन यांनी पत्रकारपरिषदेत केला. भारत आणि चिनी सैनिकांमधील तुंबळ हाणामारीत चिनी लष्कराचेही मोठे नुकसान झाले आहे. चीनचे जवळपास ४५ सैनिक या झटापटीत मारले गेले आहेत. मात्र, चीनने अधिकृतरित्या ही माहिती प्रसिद्ध केलेली नाही.