Naman Ojha Father Jailed : भारताचा माजी क्रिकेटर नमन ओझाचे वडील विनय ओझा यांना सुमारे सव्वा कोटी रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी 7 वर्षांची शिक्षा झाली आहे. या प्रकरणाचा निकाल 11 वर्षांनी लागला असून यात एकूण चार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. क्रिकेटर नमन ओझाच्या वडिलांना न्यायालयाने केवळ 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाच नाही तर 7 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.
2013 मध्ये मध्य प्रदेशच्या जौलखेड़ामध्ये असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत काही कर्मचाऱ्यांनी पैशांचा घोटाळा केला असल्याची बाब समोर आली होती. याप्रकरणी 2013 मध्ये एकूण 6 जणांच्या विरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता. अखेर 11 वर्षानंतर कोर्टाने या प्रकरणात मुख्य आरोपी असणाऱ्या अभिषेक रतनाम याला दोषी आढळले आणि त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली तसेच 80 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला. नमन ओझाचे वडील विनय त्यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत असिस्टेंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. सदर प्रकरणात दोषी आढळल्यावर त्यांना कोर्टाने 7 वर्षांची शिक्षा आणि 7 लाखांचा दंड देखील ठोठावला. तर यांच्या सोबत धनराज पवार आणि लखन हिंगवे या दोघांना देखील प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा आणि 7 लाखांचा दंड करण्यात आला.
हेही वाचा : मॅच सुरु होण्याची वेळ बदलली, मेलबर्न टेस्ट पाहण्यासाठी चाहत्यांची होणार झोपमोड, फ्री मध्ये कुठे पाहाल मॅच?
सदर प्रकरणातील प्रमुख आरोपी अभिषेक रतनामने बँक कर्मचाऱ्यांचे पासवर्ड वापरून हा घोटाळा केल्याचे समोर आले. जेव्हा हे प्रकरण समोर आले आणि या प्रकरणाचा तपास सुरु झाला तेव्हा नमन ओझाचे वडील विनय हे बँक ऑफ महाराष्ट्राच्या त्याच शाखेत काम करत होते. तसेच या प्रकरणी फ्रॉडमध्ये विनय ओझा यांचा सहभाग असल्याचे आढळून आले. या प्रकरणाची चौकशी खूप काळ चालली आणि या दरम्यान बँक कॅशियर दीनानाथ राठौड़ यांचे देखील निधन झाले. त्याच्याशिवाय प्रशिक्षणार्थी शाखा व्यवस्थापक नीलेश चटरोळे यांच्या आयडी आणि पासवर्डचा हा घोटाळा करण्यासाठी गैरवापर करण्यात आला. वकील विशाल कोडाले यांनी सांगितले की, अभिषेक रतनाम आणि विनय ओझा यांनी त्यांच्या एजंट्सला हाताशी धरून बनावट खाते बनवले आणि या माध्यमातून 1.25 कोटी रुपयांचा घोटाळा केला.
भारताचा माजी क्रिकेटर नमन ओझा याने भारताकडून टेस्ट, वनडे आणि टी 20 फॉरमॅटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पदार्पण केले. नमन ओझाला भारताकडून खेळण्याची जास्त संधी मिळाली नाही. नमनने टेस्टमध्ये 1 सामना खेळाला यात त्याने दोन इनिंगमध्ये 56 धावा केल्या. वनडे क्रिकेटमध्ये एक धाव, टी 20 मध्ये 2 सामन्यांमध्ये 12 धावा केल्या. आयपीएलमध्ये नमन ओझाने 113 सामने खेळले असून यात 1554 धावा केल्या. 15 फेब्रुवारी 2021 रोजी नमनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.