न्यायालयासमोर १३ पोपटांना हजर केलं जातं तेव्हा...

झालं असं की....

Updated: Oct 16, 2019, 10:55 PM IST
न्यायालयासमोर १३ पोपटांना हजर केलं जातं तेव्हा...  title=

मुंबई : दिल्लीतील न्यायालयात घडलेल्या एका घटनेने अनेकांनाच धक्का दिला आहे. मुळात ही घटना आहेच तशी. दिल्लीतील एका न्यायालयात बुधवारी १३ पोपट पक्ष्यांना हजर करण्यात आलं. या पोपटांची तस्करी करुन त्यांना उझबेकिस्तान येथे नेण्यात येत होतं. पणस सीआयएसएफच्या सतर्कतेमुळे कस्टम विभागाकडून या पोपटांना ताब्यात घेण्यात आलं. ज्यानंतर त्यांना सोडवण्यासाठी न्यायालयाचं दारही ठोठवण्यात आलं. 

विमानतळावर एक उझबेक इसम बुटांच्या खोक्यातून पोपट लपवण्याचा आणि विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था चुकवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या या संशयास्पद हालचाली पाहून कस्टम विभागाते तातडीने त्याला ताब्यात घेतलं. ज्यानंतर कस्टम विभागाच्या नियमांचं  आणि वन्यजीव संरक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली. 

आरोपीवर कारवाई करत त्या पोपटांना रितसर मोकळीक मिळण्यासाठी म्हणून चक्क न्यायालयीन सत्रात न्यायाधीशांसमोर हजर केलं गेलं. हे पाहून प्रथमदर्शनी अनेकांना धक्काच बसला. कस्टम विभागाकडून या पोपटांची तस्करी थांबवण्यात आली असली तरीही, त्यांना आकाशात सोडण्यासाठी मात्र न्यायालयाच्या रितसर आदेशाची आवश्यकता होती. ज्याकरता या पोपटांना घेऊन कस्टम विभाग पटियाला हाऊस कोर्ट येथे पोहोचलं जेथे पोपटांना वन विभाग अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं. 

१३ पोपटांची तस्करी करणाऱ्या आणि मुळच्या उझबेकिस्तानच्या असणाऱ्या आरोपीच्या वकिलांकडून त्याच्या जामीनासाठी प्रयत्न करण्यात आले. पण, न्यायाधीशांनी मात्र आरोपीला चांगलीच शिक्षा सुनावली. १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावत या पोपटांना मुक्त करण्याचे आदेश त्यांनी दिले.