राजस्थानमध्ये कोरोनाचे ३० रुग्ण, प्रत्येक घराचं स्क्रिनिंग करणार

राजस्थानात कोरोनाचे ३० रुग्ण आढळून आलेत त्यातील १३ रुग्ण एकट्या भिलवाडामध्ये सापडले

Updated: Mar 25, 2020, 10:58 AM IST
राजस्थानमध्ये कोरोनाचे ३० रुग्ण, प्रत्येक घराचं स्क्रिनिंग करणार  title=

नवी दिल्ली : राजस्थानात कोरोनाचे ३० रुग्ण आढळून आलेत त्यातील १३ रुग्ण एकट्या भिलवाडामध्ये सापडलेत. त्यामुळे भिलवाडा हे देशातील कोरोनाचं केंद्र ठरलंय. भिलवाडामध्ये गेल्या ५ दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आलीये. एका खासगी डॉक्टरमुळे हे संक्रमण वेगानं पसरलं.

ज्या रुग्णालयात हे संक्रमण झालं त्या रुग्णालयात भीलवाडातल्या विविध भागातून ५०० रुग्ण उपचारासाठी आले होते. त्यामुळे संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आता प्रत्येक घराचं स्क्रिनिंग करण्यात येत आहे. 

आतापर्यंत भिलवाडा आणि त्याच्यानजीकच्या गावांतील ९ लाख नागरिकांची स्क्रिनिंग करण्यात आलीये. कोरोनाबाधीत डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या १४४ नागरिकांना आयसोलेट करण्यात आलय. तसंच या रुग्णालयात कामानिमित्त आलेल्या ५ हजार ३९२ नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आलंय.
 
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांच्या  लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधानांनी केली. हा २१ दिवसांचा कालावधी भारतासाठी निर्णायक असेल असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. 

या काळात आपण कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरलो तर देश उद्ध्वस्त होईल. आपण २१ वर्ष मागे फेकले जाऊ, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
 
गेल्या काही दिवसांपासून राज्य पातळीवर लॉकडाऊन करूनही नागरिक परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्यायला तयार नाहीत.

अनेकजण बाजारपेठा आणि रस्त्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे आता मोदींच्या सांगण्याने तरी या परिस्थितीत काही फरक पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.