भीषण अपघातात महिला आमदाराचा मृत्यू; CM श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले, 'ती माझी नातलग होती'

Women MLA Dies In Horrific Road Accident: मुख्यमंत्र्यांनी या महिला आमदाराला श्रद्धांजली अर्पण करताना ती आपली नातलग होती असं म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तिचा आकस्मिक मृत्यू होणं हे फार दुर्देवी असल्याचं एक जुना संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 23, 2024, 09:33 AM IST
भीषण अपघातात महिला आमदाराचा मृत्यू; CM श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले, 'ती माझी नातलग होती' title=
उपचारादरम्यान या महिला आमदाराचं निधन झालं

Women MLA Dies In Horrific Road Accident: भरधाव वेगातील आलीशान कार डिव्हायडरला धडकल्याने एका तरुण महिला आमदाराचा मृत्यू झाला आहे. तेलंगणमधील सिकंदराबाद केंट येथील भारत राष्ट्रीय समितीच्या महिला आमदाराचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. आमदार लस्या नंदिता यांनी रस्ते अपघातामध्ये प्राण गमावला आहे. लस्या या आपल्या कारमधून प्रवास करत होत्या त्यावेळी संगारेड्डीमधील अमीनपूर परिसरातील सुल्तानपूर आउटर रिंग रोडवर त्यांच्या कारचालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगातील ही कार डिव्हायडरला धडकली. 

चालकाची प्रकृती चिंताजनक

संगारेड्डीमध्ये झालेल्या या अपघातामध्ये आमदार लस्या यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. या दुर्घटनेमध्ये लस्या यांच्या कारचा चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

पक्षप्रमुखांनी व्यक्त केला शोक

लस्या नंदिता यांच्या आकस्मिक निधनानंतर बीआरएसचे प्रमुख असलेल्या केसीआर यांनी शोक व्यक्त केला आहे. एक आमदार म्हणून आपल्या कामांमधून ओळख निर्माण करणाऱ्या लस्या नंदिता यांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याचं समजल्याने फार दु:खी झालो आहे, असं केसीआर म्हणाले. या दु:खाच्या काळात माझ्या सर्व सहवेदना त्यांच्या कुटुंबियांबरोबर आहेत, असंही माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 17 फेब्रुवारी रोजी लस्या नंदिता यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर अकाऊंटवरुन) पक्षप्रमुख केसीआर यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

मुख्यमंत्री म्हणाले, माझी नातलग होती ती

तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तरुण महिला आमदाराच्या निधनानंतर सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त करताना श्रद्धांजली अपर्ण केली आहे. श्रद्धांजली अर्पण करताना मयत आमदार ही आपल्या नात्यातील होती असा खुलासा रेड्डी यांनी केला आहे.

"कँटच्या आमदार लस्या नंदिता यांच्या आकस्मित मृत्यूमुळे मोठा धक्का बसला आहे. नंदिता यांचे वडील जी. सयन्ना हे माझे जवळचे नातेवाईक होते. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यातच त्यांचं निधन झालं. त्याच महिन्यात नंदिताचं आकस्मिक निधन होणं ही फारच दु:खद घटना आहे. मी त्यांच्या कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो," असं रेवंत रेड्डी यांनी म्हटलं आहे.

नंदिता यांचा जन्म 1987 साली झाला होता. त्या केवळ 37 वर्षांच्या होत्या.