'5 पैशांचे नाणे घेऊन या, हवी तेवढी बिर्याणी खा', ऑफरने हॉटेल मालकालाच फुटला घाम

सध्याच्या जमान्यात 5 पैशे कोणाकडे असतील?, हा विचार करुन हॉटेलच्या प्रसिद्धीसाठी हॉटेल मालकाने ऑफर दिली खरी पण...

Updated: Jul 21, 2021, 10:42 PM IST
'5 पैशांचे नाणे घेऊन या, हवी तेवढी बिर्याणी खा', ऑफरने हॉटेल मालकालाच फुटला घाम

चेन्नई : 5 पैशांचं नाणं उपयोग येईल, याचा सध्याच्या जमान्यात कोणी विचारही करु शकणार नाही. पण हाच विचार करुन एका बिर्याणी हॉटेलच्या मालकाला एक भन्नाट कल्पना सुचली. 

एका व्यक्तीने सुकन्या बिर्याणी हॉटेलची सुरुवात केली. मग आपल्या हॉटेलच्या जाहीरातीसाठी हॉटेल मालकाने एक भन्नाट ऑफर दिली. जो 5 पैशांचे नाणे घेऊन येईल त्याला बिर्याणी दिली जाईल. पण त्याची ही आयडीया त्याच्या चांगलीच अंगलट आली. 

तामिळनाडुतल्या चेन्नईमध्ये घडलेला हा प्रकार आहे. हॉटेल मालकाला कदाचित याची कल्पना आली नाही की त्याच्या या ऑफरमुळे काय गोंधळ उडणार आहे. 

चेन्नईच्या सेल्लूर भागात असलेल्या या बिर्याणी हॉटेलबाहेर 5 पैशात बिर्याणी खाण्यासाठी भलीमोठी रांग लागली. हातात 5 पैशाचं नाणे घेऊन अनेक जण हॉटेलमध्ये आले. एक वेळ तर अशी आली की हॉटेलबाहेर 300 लोकं रांगेत उभे होते. गर्दीमुळे एकच गोंधळ उडाला आणि अखेर गोंधळामुळे हॉटेलमालकाला शटर खाली करावं लागलं. 

5 पैशात बिर्याणी खाण्याच्या नादात लोकं कोरोना अजून आहे हेच विसरले. लोकांना मास्कचाही विसर पडला, सोशल डिस्टिन्सिंगचा तर फज्जाच उडाला. फक्त हातात 5 पैशांचं नाणं घेऊन लोक उभे होते. गर्दी आवाक्याबाहेर गेल्यावर अखेर पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी लोकांना कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. काहीनी 5 पैशांचे नाणे देऊनही बिर्याणी न मिळाल्याची तक्रार बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांकडे केली.