मुंबई: ऑफिसमध्ये नोकरी करणाऱ्या आणि त्यातही इंटरनेट वापरणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांबाबत एक महत्त्वाची आकडेवारी पुढे आली आहे. देशातील नोकरी करणाऱ्या बहुतांश कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ६३ टक्के भारतीय हे ऑफिसमध्ये इंटरनेटवर फिरायला जाण्याची ठिकाणे शोधत असतात. खास करून दुपारचे जेवन झाल्यानंतरच्या काळात ही ठिकाणे सर्च करण्याचे प्रमाण अधिक असल्याचेही पुढे आले आहे. ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील ट्रॅव्हल सर्च डेटा तपासला. त्यानुसार कायकने दिलेल्या आकडेवारीत हे प्रमाण पुढे आले.
कायकने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ६३ टक्के भारतीय कर्मचारी कार्यालयीने वेळेत फिरायला जाण्याची ठिकाणे शोधतात. इंटरनेटवर हा शोध घेण्याचा प्रमाण सकाळी ९ ते ६ या दरम्यानचे आहे. त्यातही दुपारनंतर हा वेग आणि वेळही काहीसा वाढत असल्याचे कायक सांगते. साधारण सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत याविषयी विशेष सर्च होत नाही. पण, दुपारी १ ते ३ या कालावधीत फिरायला जाण्याची ठिकाणे शोधण्याचे प्रमाण १९ टक्के इतके आहे. आपल्याला ठाऊकच आहे, दुपारी १ ते ३ हा कालावधी हा दुपारच्या जेवनवेळेचा आहे.
कायकने असेही सांगितले आहे की, पर्यटनासाठी एकूण सर्चच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक पसंती ही दुबईला (९४ टक्के) आहे. तर, बँकॉकचा क्रमांक दुसरा आहे. बँकॉक सर्च करणाऱ्या मंडळींचे प्रमाण ९२ टक्के इतके आहे. तर, त्यानंतर सिंगापूर, बाली, इंडोनेशिया आदींचा क्रमांक लागतो. गोव्याला प्राधान्य देणाऱ्यांमध्ये १२ टक्के लोकांचा समावेश आहे. तर काहींना सॅन फ्रान्सिस्कोलादेखील जावे वाटते. अशा मंडळींचे प्रमाण १९ टक्के आहे. तर, दिल्ली आणि मुंबईला १२ टक्के आणि लंडन न्यूयॉर्कला केवळ दोन टक्के लोग जाऊ इच्छितात.